पोलीस महासंचालक जयस्वाल यांच्या पोलिसांना सूचना

मुंबई : भ्रष्टाचाराला अजिबात थारा न देता पोलीस म्हणून कर्तव्य बजावताना आखून दिलेल्या सीमारेषेपलीकडे पाऊल पडणार नाही, याची दक्षता राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना गुरुवारी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिल्या.

महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जयस्वाल बोलत होते. जयस्वाल मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. राज्याचा पोलीस महासंचालक झालो म्हणून कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या बदलत नाहीत. पर्यायाने प्राधान्यक्रमही बदलत नाही. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या सुरक्षेसाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी, गुन्ह्य़ांची लवकरात लवकर उकल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्षमता राज्य पोलीस दलाकडे आहेत. त्यात आणखी भर घालण्याचा उद्देश असेल, असे जयस्वाल म्हणाले.

सद्य:स्थितीत सीमेवरील घडामोडींमुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईवर हल्ला होईल, असे स्पष्ट संकेत केंद्राकडून मिळालेले नाहीत. मात्र सतर्क राहाण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सदृढ मनुष्यबळ लाभलेले पोलीस दल कोणत्याही परिस्थितीत लढू शकते. हे लक्षात घेऊन मुंबईप्रमाणे आता राज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबतविशेष उपक्रम हाती घेतले जातील, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

पडसलगीकर यांनी मानवंदना नाकारली

सीमेवर  युद्धसदृश परिस्थिती असल्याने दत्ता पडसलगीकर यांनी नायगाव येथील पोलीस मुख्यालयात औपचारिक मानवंदना नाकारली.

मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचा पोलीस महासंचालक म्हणून कर्तव्य बजावणे आव्हानात्मक होते. हे आव्हान यशस्वीपणे पेलल्याचे समाधान आहे. राज्य पोलीस दल आणि या दलातील विविध घटक सक्षम आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पोलीस दलाने चांगली कामगिरी बजावली. भविष्यातही पोलीस दल अशीच कामगिरी करेल, असा विश्वास आहे.

-दत्ता पडसलगीकर, मावळते पोलीस महासंचालक