१९ वर्षीय मॉडेलचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या आरोपीला ओशिवरा पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. गेल्या तीन महिन्यांपासून हा आरोपी फरार होता. मानधात सिंग (३५) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर खंडणी, मारहाण, फसवणूक आणि बलात्काराचे तब्बल ४० गुन्हे जयपूर आणि ठाण्यात दाखल आहेत. त्याला पकडण्यासाठी जयपूर पोलिसांनी ११ लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.
ओशिवरा येथे राहणारी १९ वर्षीय मॉडेल बिदिशा सेन (नाव बदलले) हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते. फेब्रुवारी २०१३ पासून ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने ओशिवरा पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर मानधात सिंग (३५) याने तिचे अपहरण केल्याचे पोलिसांना समजले. मानधात सिंग हा राजस्थानमधील कुख्यात गुंड असून त्याच्यावर तब्बल ४० गुन्ह्य़ांची नोंद आहे. मारहाण, जिवे ठार मारणे, अपहरण आदींसह ठाण्यात दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. ओशिवरा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आणि अवघा एक पोलीस हवालदार या दोघांनी दिल्लीत जाऊन त्याला अटक केली आणि या मॉडेलची सुटका केली. मानधात चित्रपटात काम करू इच्छिणाऱ्यांची मॉडेलसमवेत ‘कॉफी मीटिंग’ आयोजित करून त्यांची फसवणूक करीत असे. सुरुवातीला त्याने बिदिशाला सोबत घेतले. नंतर मात्र आपले खरे रूप दाखवत तिला त्याने जबरदस्तीने पळवून नेले. विविध शहरांत तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याने सिंग याच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे.