News Flash

परदेशातून मुंबईत परतलेल्या मुलाला घरात सापडला आईचा सांगाडा

एखाद्या वृद्धाश्रमात आपली सोय करून द्यावी

(प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबईच्या लोखंडवाला परिसरात रविवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या काही काळापासून परदेशात असलेले ऋतुराज साहनी आपल्या ओशिवरा येथील घरी परतले. फ्लॅटच्या दाराशी आल्यानंतर त्यांनी दार ठोठावले. मात्र, बराच काळ आतून त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. अखेर ऋतुराज यांनी बनावट चावीच्या सहाय्याने दार उघडून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. फ्लॅटच्या बेडरूममध्ये त्यांना आपल्या ६३ वर्षीय आईच्या शरीराचा सांगाडा दृष्टीस पडला. या धक्क्यातून सावरत त्यांनी पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन हा सांगाडा ताब्यात घेतला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ऋतुराज साहनी यांच्या आईचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा. मात्र, तेव्हापासून हा मृतदेह तसाच पडून राहिल्याने त्यावरील मांस झडून जाऊन सांगाडाच शिल्लक राहिला असावा. घराचे दार आतूनच बंद होते. याशिवाय, अंगावर कुठेही दुखापतीच्या खुणा आढळून न आल्यामुळे त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात असणाऱ्या वेल्स कॉट सोसायटीमधील इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आशा साहनी राहत होत्या. २०१३ मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता तेव्हापासूनच त्या घरात एकट्याच असायच्या. त्यांचा मुलगा ऋतुराज १९९७ सालीच अमेरिकेत राहायला गेला होता. त्यानंतर फोनवरून हे सर्वजण संपर्कात होते. एप्रिल २०१६ मध्ये ऋतुराज यांचे आपल्या आईशी शेवटचे संभाषण झाले होते. त्यावेळी आपल्याला खूप एकटेपणा जाणवत असून एखाद्या वृद्धाश्रमात आपली सोय करून द्यावी, असे आशा साहनी यांनी आपल्या मुलाला सांगितले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहाव्या मजल्यावर दोन फ्लॅट होते. हे दोन्हीही फ्लॅट साहनी यांच्याच मालकीचे होते. त्यामुळे इमारतीमधील इतर रहिवाशांना मृतदेहाची दुर्गंधी आली नसावी. ऋतुराज बेडरूममध्ये शिरले तेव्हा त्यांच्या आईचा मृतदेह इतका कुजला होता की, केवळ हाडांचा सांगाडा शिल्लक राहिला होता. त्यामुळे आशा साहनी यांच्या मृत्यू अनेक आठवड्यांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता खानविलकर यांनी व्यक्त केली. पोलीस सध्या या प्रकरणी कसून तपास करत आहेत. सध्या त्यांच्याकडून ऋतुराज आणि बिल्डिंगमधील इतर रहिवाशांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग येऊ शकतो, असेही खानविलकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 10:51 am

Web Title: man reaches mother flat on return from us finds her skeleton
Next Stories
1 मुंबईत ‘बेस्ट’च्या संपाला सुरुवात; दुपारी ३ वाजता मातोश्रीवर बैठक
2 पावसाची पाठच..
3 विधिमंडळ अधिवेशनात मराठा मोर्चाचे प्रतिबिंब
Just Now!
X