News Flash

फुलपाखरांना मराठी ओळख

राज्य जैवविविधता मंडळाकडून ३७७ फुलपाखरांना मराठी नावे

(संग्रहित छायाचित्र)

‘राज्य फुलपाखरू’ घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असले तरी राज्यातील फुलपाखरं ओळखली जायची ती इंग्रजी नावानेच. पण यापुढे नीलायम, भिरभिरी, पवळ्या, रुपमाला, रुईकर, झिंगोरी, झुडपी, हबशी, हळदीकुंकू, ढवळ्या, भटक्या, मयुरेश, गडद गवत्या अशा विविध नावांनी ही फुलपाखरं ओळखली जाणार आहेत.

राज्य जैवविविधता मंडळाने याबाबत पुढाकार घेवून ३७७ फुलपाखरांसाठी मराठी नावं निश्चित केली असून लवकरच या नावांची छायाचित्रांसहित पुस्तिका प्रकाशित होईल.

पक्षी, प्राणी यांच्यासाठी मराठी नावं असली तरी फुलपाखरं मात्र इंग्रजीतच ओळखली जायची. इंग्रज अमदानीच्या काळात निसर्गप्रेमी अशा काही इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतातील फुलपाखरांना कमांडर, सार्जन्ट, कार्पोरल अशी नावंदेखील दिली होती. ‘फुलपाखरांच्या मराठी नावांबाबत साहित्यातदेखील फारशी उत्सुकता दिसत नव्हती. ग्रामीण पातळीवरदेखील त्यांना काही विशिष्ट नावं आढळत नव्हती. त्यामुळे फुलपाखरांना मराठी नावं सुचवण्याचे आवाहन करण्यात आले होते. आलेल्या सूचनांचा विचार करून अंतिम यादी तयार केली आहे. लवकरच त्याची पुस्तिका तयार करून प्रकाशित करण्यात येईल. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत असलेल्या जैवविविधता मंडळाने तयार करावयाच्या स्थानिक जैवविविधेतेच्या नोंदवहीसाठी ही नावं उपयोगी ठरणार आहेत.’ असे राज्याच्या जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांची सूची उपलब्ध नसल्यामुळे मंडळाने नेमलेल्या समितीने राज्यातील विविध ठिकाणच्या पर्यावरण अभ्यासकांच्या मदतीने सहा कुळांमध्ये (फॅमिली) विभागलेली ३७७ फुलपाखरांची सूची पूर्ण करण्याचे काम सर्वप्रथम करण्यात आले.

‘फुलपाखरांची नावं सुचवताना काही जणांनी फुलपाखरांच्या कुळांची मराठी नावं देखील सुचवली. तसेच आम्ही आधी प्रस्तावित केलेल्या नावांनादेखील काही उत्तम पर्याय मिळाले. मराठी नावं देताना भाषांतर न करता रंग, रूप, अधिवासाचे झाड यांचा विचार करण्यात आला. ’ असे जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.

डॉ. विलास बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राजू कसंबे, डॉ. जयंत वडतकर, हेमंत ओगले आणि दिवाकर ठोंबरे यांचा नाव ठरविण्याच्या समितीत समावेश होता. तसेच भारतीय प्राणी संर्वेक्षण, वन विभाग, अभय उजागरे, आयझ्ॉक किहिमकर, डॉ. अमोल पटवर्धन, प्रा. सुधाकर कुऱ्हाडे, गिद आणि राज्यभरातील २५ पर्यावरणप्रेमी संस्थांनी अनेक नावं सुचवली आहेत.

फुलपाखरांची सहा कुळे

निल कूळ, चपळ कूळ, कुंचलपाद कूळ, पुच्छ कूळ, पितश्वेत कूळ, मुग्धपंखी कूळ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 1:12 am

Web Title: marathi introduction of butterflies
Next Stories
1 अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होणार !
2 तीनही रेल्वे मार्गांवर ‘मेगा ब्लॉक’, मुंबई-पुणे दरम्यानच्या अनेक एक्स्प्रेसवर परिणाम
3 ‘भाषां’मुळे निकालघसरण; लिहिण्याच्या सवयीअभावी विद्यार्थ्यांची अडचण 
Just Now!
X