महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा इथल्या लोकांना झाला पाहिजे. राज्यातील रोजगार आणि वाहन परवान्यांचे वाटप करताना मराठी लोकांना प्राधान्य मिळाले पाहिजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एक ना अनेक मुद्दे उपस्थित करत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठीचा राग आळवला. राज ठाकरे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांची माहिती राज यांनी पत्रकारपरिषदेत दिली. महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा इथल्या लोकांना झाला पाहिजे. येथील रोजगार आणि वाहन परवान्यांच्या वाटपामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनापासून प्रयत्न करावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे राज यांनी सांगितले.
याशिवाय, महाराष्ट्रात डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक करण्यात यावे. तसेच राज्याचे अधिवास धोरण जाहीर करण्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केल्याचे राज यांनी सांगितले. दरम्यान, राज यांनी पत्रकारपरिषदेत मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून शिवसेनेला लक्ष्य केले. रस्ते, फुटपाथ हे खड्ड्यात घातलेत आणि तरीही रोड टॅक्स वसूल केला जातो. घाणेरडे फुटपाथ आणि रस्ते असूनही लोक पालिकेत इतकी वर्षे शिवसेनेला मतदान कसे करतात, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.