मुंबईमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. दिवसोंदिवस मुंबईत सापडणाऱ्या करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून अधिक काळजी घेतली जात आहे. मात्र वरळीचे आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये रात्री उशीरापर्यंत अनेक पब सुरु असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही वरळीमध्ये मध्यरात्रीपर्यंत अभिनेत्री दिशा पटानी आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाच्या शुटींगला परवानगी देण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये भरवस्तीमध्ये करोनाच्या नियमांचे उल्लंघन करत चित्रपटाच्या शुटींगला परवानगी देण्यात आल्याचा आरोप मनसेचे वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष धुरी यांनी केलाय. धुरी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘केम छो वरळीचे मराठी सत्य’ अशा मथळ्याखाली धुरी यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यामध्ये ‘युवराजांची दिशा चुकली’ असा उल्लेख करुन आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधालया.

शुक्रवारी कोळीवाड्यामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत एका चित्रपटाचे शुटिंग सुरु होतं अशा दावा धुरी यांनी केलाय. दिशा पटानी आणि जॉन अब्राहम यांच्या सिनेमाचे हे शुटिंग सुरू होते. रात्रीपर्यंत या सिनेमाचे शुटिंग सुरू होते. रात्री साडेबारा वाजता शुटिंग बंद करण्यात आले होते. या सिनेमाच्या शुटिंगसाठी कुणाची परवानगी होती?, याला युवराजांचा आशिर्वाद आहे की महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचा?, असा सवाल संतोष धुरी यांनी उपस्थितीत केला आहे. सामान्यांना एक न्याय आणि सेलिब्रिटींनी एक न्याय. या ठिकाणी बघ्यांचीही गर्दी झाली. सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला. फेस मास्क कुणी लावलं नव्हतं काही नव्हतं. वरळी विधानसभा क्षेत्रात करोनाला प्रवेश करण्यास बंदी असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पबसंदर्भातील प्रकार उघडकीस आल्यानंतरही महापालिका अधिकारी अशाप्रकारची परवानगी देत असतील तर हे निंदनीय आहे, असा टोलाही धुरी यांनी लगावला आहे.

या पूर्वीही वरळीमधील अनेक पब्समध्ये कशाप्रकारे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जातोय यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाले होते.