वडाळा स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोनो रेलची सेवा ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी हा बिघाड उदभवल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मोनो रेल सेवा विस्कळीत झाल्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मोनो रेल ठप्प झाल्याची माहिती आहे.

बऱ्याच वेळापासून प्रवासी स्थानकात थांबून आहेत. अलीकडेच मोनो रेलचा सात रस्त्यापर्यंत दुसरा टप्पा सुरु झाला. पहिल्या टप्प्यात मोनो रेलकडे फारसे प्रवासी वळले नव्हते. पण दुसऱ्या टप्प्यात लोअर परेल, करीरोड, सात रस्ता या स्थानकांमुळे मोनोची प्रवासी संख्या वाढली.

या भागात अनेक कॉर्पोरेट कार्यालये आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी आरामदायी प्रवासासाठी मोनोच पर्याय स्वीकारतात. मोनो रेलचा दुसरा टप्पा सुरु झाला असला तरी अजूनही वेळापत्रकाप्रमाणे या मार्गावर रेल धावत नाहीत. पंधरा ते वीस मिनिटांनी एक ट्रेन येते तसेच स्थानकात प्रवाशांच्या बसण्यासाठी सुद्धा कुठलीही व्यवस्था केलेली नाही.