सव्‍‌र्हरमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत

विद्यापीठाच्या निकाल गोंधळाचे सत्र अजून पुरते संपलेले नसताना आता परीक्षांमध्येही घोळ सुरू झाले आहेत. विद्यापीठाच्या सव्‍‌र्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुपारच्या सत्रातील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना मंगळवारी उशिरा प्राप्त झाल्या. परिणामी या सत्राच्या परीक्षांना सुमारे तासाभराचा  विलंब होत आहे.

विद्यापीठाच्या तृतीय आणि प्रथम वर्षांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. दुपारच्या सत्रात सुरू होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याची लिंक सुमारे दीड वाजता सुरू होते. त्यानंतर प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून महाविद्यालये त्याची प्रिंट घेतात. परंतु मंगळवारी विद्यापीठाच्या सव्‍‌र्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दोन वाजले तरी बहुतांश महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणेच शक्य झालेले नाही. त्यामुळे पेपर डाऊनलोड झाल्यापासून ते प्रिंट घेऊन गठ्ठे तयार करण्याच्या कामांना वेळ लागत असल्याने तीन वाजता सुरू होणारे पेपर सुमारे अर्धा तास उशिरा म्हणजे साडे तीन वाजता सुरू झाले.

काही ठिकाणी लिंक सुरू झाली तर महाविद्यालयांना लॉग-इन करण्यामध्ये अडचणी येत असल्याने सुमारे चार वाजता पेपर सुरू झाले आहेत. विद्यापीठाच्या सव्‍‌र्हर बिघाडामुळे विस्कटलेले पेपरचे वेळापत्रक यामुळे सुमारे तासभर लांबले असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून सांगण्यात आले आहे. शारीरिक दृष्टय़ा अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना एक तास अधिक देण्यात येतो. लांबलेल्या परीक्षेच्या वेळेमुळे या विद्यार्थ्यांना पेपर देऊन निघण्यास सुमारे साडे सात वाजले असल्याचेही प्राचार्यानी व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

विद्यापीठाच्या दुपारच्या सत्राच्या परीक्षांची वेळ अडीच ते साडेपाच अशी होती. मात्र यावेळी यामध्ये बदल करून तीन ते सहा अशी करण्यात आली आहे. परीक्षा संपल्यानंतर संध्याकाळी घरी जाण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत. त्यात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना संध्याकाळच्या वेळी वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तेव्हा विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करून परीक्षेच्या वेळा ठरवाव्यात अशी मागणी विद्यार्थी वर्गातून केली जात आहे.

विद्यापीठाच्या चुकांचा पाढा संपता संपेना

निकालाच्या गोंधळामुळे पुरते पोळून निघालेल्या विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आदी बाबींच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विधिच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू आहे. विद्यापीठाने मात्र या सत्राचे परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. यामध्ये परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २८ नोव्हेंबपर्यंत देण्यात आली आहे. या संदर्भात स्टुडंट लॉ कौन्सिलने तक्रार केल्यानंतर मंगळवारी यामध्ये बदल करून १६ डिसेंबपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दरवेळेस विद्यापीठाने नियोजनामध्ये घोळ घालायचे आणि विद्यार्थ्यांनी तक्रार करून ते सोडवायचे, हे आता सवयीचे झाले आहे. तेव्हा विद्यापीठाच्या चुकांचा पाढा संपता संपेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.