पदपथाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ टाळण्यासाठी पालिकेत ठरावाची सूचना

अरुंद रस्त्यांवरील पदपथांबाबत रहिवाशांची होणारी अडचण लक्षात घेऊन आता स्थानिकांच्या मागणीवरून लोकप्रतिनिधीच रस्त्याच्या दोन्हीऐवजी एका बाजूलाच पदपथ हवा, अशी मागणी घेऊन सरसावले आहेत. अरुंद गल्ल्यांमधील एका बाजूचे पदपथ तरी कमी करावेत, अशी ठरावाची सूचना नगरसेविकेने गुरुवारी महापालिकेच्या सभेपुढे मांडली आहे. ठरावाच्या सूचनेवर प्रशासन काय भूमिका घेते त्यावरून मुंबईतील पदपथांचे भविष्यातील धोरण ठरू शकेल.

रस्त्यांवर चालण्याचा पहिला हक्क हा पादचाऱ्यांचा असतो. वाहनांच्या गर्दीत व वेगात पादचाऱ्यांना सुरक्षित चालण्यास योग्य वाट मिळावी यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पदपथ असावेत, असे बंधन इंडियन रोड काँग्रेस-रस्त्यांच्या रचनेविषयी असलेल्या मार्गदर्शन तत्त्वांमध्ये घालण्यात आले आहे. या मार्गदर्शन तत्त्वावर बोट ठेवून प्रशासन दोन्ही बाजूंना पदपथ आवश्यक असल्याचे सांगते. मात्र मुंबईतील पदपथ हे चालण्यासाठी कमी व अतिक्रमणासाठी अधिक वापरले जातात. दुकानांचे अर्धे सामान व फेरीवाल्यांनी व्यापलेल्या पदपथांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून वाहनांमधून वाट काढत चालावे लागते. माझ्या आईवडिलांनाही मुंबईच्या पदपथांवरून चालण्याची भीती वाटते, अशी कबुली देत महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शहरातील पदपथांची दुर्दशा मान्यच केली होती. पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने डिसेंबरमध्ये धोरण आखले असले तरी त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. त्यातच मुंबईत वाढलेल्या इमारती, वाहने व त्यांच्या तुलनेत अरुंद राहिलेले रस्ते यामुळे शहराच्या अनेक भागांत स्थानिकांकडूनच पदपथ काढून टाकण्याची मागणी होत आहे. कांदिवली पश्चिमेतील डहाणूकरवाडी येथील रहिवाशांनीही अरुंद रस्त्यांवरील दोन्ही बाजूंच्या पदपथांमुळे होत असलेल्या त्रासाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली होती. यासंबंधीची बातमी ‘लोकसत्ता- मुंबई’ने २६ मे रोजी प्रसिद्ध केली होती.

वांद्रे येथील भाजपच्या नगरसेविका व माजी उपमहापौर अलका केरकर यांच्यावरही स्थानिकांकडून पदपथ काढण्याचा दबाव येत आहे. वांद्रे येथे आधी लहान बंगले होते. तिथे आता टॉवर उभे राहिले आहेत. प्रत्येकाकडे किमान दोन गाडय़ा आहेत. मात्र रस्त्यांची रुंदी वाढलेली नाही. दोन्ही बाजूंच्या पदपथामुळे रस्त्यांची रुंदी आणखी कमी होते. पदपथ बांधू नयेत, असे पालिका अधिकाऱ्यांना सांगितले की, ते नियमावर बोट ठेवतात. त्यामुळे ३० फूट रस्त्यावर केवळ एकाच बाजूने पदपथ ठेवावा, ही ठरावाची सूचना मांडली आहे, असे अलका केरकर यांनी सांगितले. पादचाऱ्यांसाठीही पदपथ हवे. येत्या मंगळवारी, २० जून रोजी होत असलेल्या पालिका सभेपुढे यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या. पदपथाच्या समांतर रेषेत गटाराची झाकणे बसवण्याचे कौशल्य आपल्याला अवगत नाही. त्यातच इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर पदपथाला उतार दिला असला तरी चालणाऱ्याला सतत सावधान स्थितीत राहावे लागते. दोन्ही बाजूंच्या पदपथानंतर रस्त्यावर दोन गाडय़ा जाण्याएवढीही रुंदी राहत नाही. त्यातच एखाद्याने गाडी उभी केली की मग विचारायलाच नको. या पदपथाच्या समस्येसाठी नगरसेवक, आमदार, विभाग अधिकारी या सगळ्यांकडे फेऱ्या मारूनही काही उपयोग झाला नाही, असे डहाणूकरवाडी येथील रहिवासी प्रभाकर बेलोसे म्हणाले. इंडियन रोड्स काँग्रेसच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी किमान दीड मीटर रुंदीचे पदपथ असणे गरजेचे आहे. हे नियम पालिका स्तरावर बदलता येणार नाहीत, असे पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.