रस्ते बांधणी, दुरुस्तीमध्ये केल्या जाणाऱ्या कुचराईमुळे थेट मुंबईकरांना फटका बसत असून पालिकेचे कोटय़वधी रुपये पाण्यात जात आहेत. रस्तेविषयक कामांकडे यापूर्वी काणाडोळा करणाऱ्या विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांना त्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे फर्मान पालिका आयुक्तांनी दिले आहेत. कामात कुचराई करणाऱ्याची गय केली जाणार नाही, असा फतवाच आयुक्तांनी काढल्यामुळे सहाय्यक आयुक्तांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपला मोर्चा दुरुस्ती सुरू असलेल्या रस्त्यांकडे वळविला आहे.
मुंबईमधील रस्ते बांधणी, दुरुस्ती, खड्डे बुजविणे आदी कामे पालिकेच्या रस्ते विभागामार्फत करण्यात येतात. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांमधील रस्ते विभागातील अभियंत्यामार्फत या कामांवर लक्ष ठेवण्यात येते.
मात्र पालिकेच्या विभाग कार्यालयांची धुरा खांद्यावर असलेले सहाय्यक आयुक्त रस्ते कामाची जबाबदारी आपल्या अखत्यारित नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्षच करीत होते. नालेसफाई घोटाळ्यानंतर रस्ते कामांतील मातीची विल्हेवाट लावण्याच्या कामात घोटाळा होत असल्याने त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी दस्तुरखुद्द महापौर स्नेहल आंबेकर यांनी गोपनीय पत्र पाठवून अजय मेहता यांच्याकडे केली होती. तसेच दुरुस्ती केल्यानंतरही रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.
परिणामी, नालेसफाईपाठोपाठ रस्ते कामांची अजय मेहता यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. इतर कामांबरोबरच रस्त्यांच्या कामांकडेही सहाय्यक आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.
रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली, तर केवळ रस्ते विभागातील अभियंत्यांनाच नव्हे, तर यापुढे सहाय्यक आयुक्तांनाही जबाबदार धरले जाईल. सहाय्यक आयुक्तांनी आपली जबाबदारी समजूनच या कामाकडे लक्ष द्यावे, असे अजय मेहता यांनी स्पष्ट केले आहे.
रस्ते कामांविषयी आयुक्तांनी फतवा जारी करताच सहाय्यक आयुक्तांची धावपळ सुरू झाले आहेत. विभाग कार्यालयांमधील रस्ते विभागातील अभियंत्यांबरोबर बैठका घेऊन रस्तेविषयक कामाचा आढावा घेण्यास सहाय्यक आयुक्तांनी सुरुवात केली आहे.
स्वच्छता, पाणीपुरवठा, गाऱ्हाणी घेऊन येणारे नागरिक, विविध विभागांतील अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका, स्थानिक नगरसेवकांच्या मागण्या आदी विविध कामात दिवसभर व्यस्त राहणाऱ्या सहाय्यक आयुक्तांनी आता वेळ काढून विभागात कामे सुरू असलेल्या रस्त्यांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांची वक्रदृष्टी आपल्याकडे वळू नये यासाठी मंडळींची धावपळ सुरू झाली असून रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्याकडेही त्यांनी बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.