करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करा, असे आदेश राज्य शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका न नगरपंचायतींना दिले आहेत. त्याचबरोबर मुखपट्टी नाही, तर प्रवेश नाही, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारने मुखपट्टीचा वापर करण्याच्या अनेकदा सूचना दिल्या आहेत. टाळेबंदी उठविण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे उद्योग-व्यवसाय, व्यापार, नोकरी इत्यादी कारणांसाठी नागरिक मोठय़ा प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. मात्र करोना संसर्ग टाळण्यासाठी मुखपट्टीचा किंवा इतर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. विशेषत शहरी भागातील नागरिक, त्याबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोविड-१९ वर करण्यात आलेल्या उपाययोजना प्रभावी ठरणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असे शासनाचे मत झाले आहे.

या संदर्भात नगरविकास विभागाने सोमवारी एक परिपत्रक काढून, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांना नागरिकांनी मुखपट्टी वापरणे, तसेच इतर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे, यासाठी मुखपट्टी नाही तर, प्रवेश नाही ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना दिल्या आहेत. महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्य अधिकारी यांनी त्यात विशेष लक्ष घालावे, तसेच सर्वसामान्य नागरिकांचा त्यात सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे परिपत्रकात  म्हटले आहे.

नागरिकांनी मुखपट्टी वापरण्याची सवयी लाऊन घ्यावी, यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रचार, प्रसार करणे, जागोजागी फलक लावावेत. मात्र तरीही जे नागरिक मुखपट्टीचा वापर करणार नाहीत, त्यांच्या विरोधात नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.

पाच लाख लोकांवर होणार कारवाई  

करोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर व नाकावर मुखपट्टय़ा लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तरीही मुखपट्टय़ा न लावणाऱ्या दीड लाख लोकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे, तर मुखपट्टय़ा न लावणाऱ्या ५ लाख लोकांवर या महिनाभरात कारवाई करण्याचे लक्ष्य आयुक्तांनी पालिका यंत्रणेपुढे ठेवले आहे.