भाजप सत्तेत आल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जवळीक वाढली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारच्या बारामती भेटीच्या पाश्र्वभूमीवर या उभय पक्षांमधील संबंध अधिक दृढ होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर मोदी-पवार यांच्यातील भेटीनंतर राज्यातील भाजप सरकारने अजित पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या सुरू केलेल्या चौकशीचे काय होणार, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
पवार यांच्या खास निमंत्रणावरून मोदी उद्या बारामतीमधील विकास कामांची पाहणी करण्याकरिता येत आहेत. याशिवाय पवार यांच्या निवासस्थानी ते भोजन करणार आहेत. 

चौकशीचे काय होणार ?
सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरे तर बांधकाम खात्यातील घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांची चौकशी भाजप सरकारने सुरू केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते मांडीला मांडी लावून बसतात, एकमेकांचे कौतुक करतात अशा वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधातील चौकशीचा फार्स ठरण्याची भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही गंभीर असले तरी दिल्लीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे घनिष्ठ संबंध लक्षात घेता चौकशीतून फार काही बाहेर येण्याबाबत साशंकताच आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांचे पडद्याआडून गुफ्तगू असल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले असून, मोदी यांच्या भेटीवर कोणती भूमिका मांडायची हे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे याचे विधान बोलके आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या बारामती भेटीचा नाहक राजकीय अर्थ काढला जाऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

नवी नवी हळद
नवा हिरवा चुडा आहे
१४ फेब्रुवारीस बारामतीत
कमळाबाईचा साखरपुडा आहे!
– रामदास फुटाणे