१९ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या ‘क्रिस’कडून तांत्रिक काम

मुंबईतील रेल्वे आरक्षण केंद्रामध्ये क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) सुधारणा करण्यात येत आहे. त्यासाठी केल्या जाणाऱ्या तांत्रिक कामांसाठी मध्य, पश्चिम रेल्वेवरील रेल्वे आरक्षण केंद्र व संगणकीय आरक्षण १९ ऑगस्ट रोजी पावणेतीन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दिवसभरात आरक्षण सेवा दोन टप्प्याटप्यांत बंद राहील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

सध्या देशभरात रेल्वे आरक्षणाचे मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता येथे मुख्य डेटा सेंटर असून सिकंदराबाद येथेही एक डेटा सेंटर आहेत. भूकंप, आग लागणे किंवा कोणतीही मोठी घटना घडल्यास त्यावेळीही आरक्षण यंत्रणेत समस्या येऊ नये किंवा अन्य डेटा सेंटरमधून आरक्षण यंत्रणा हाताळता यावी यासाठी क्रिसकडून आरक्षण यंत्रणेत तांत्रिक बदल केले जात आहेत.

त्यासाठी चाचणी केली जात असून १९ ऑगस्ट रोजी याच कामानिमित्त मुंबईतील आरक्षण केंद्र (पीआरएस) व ऑनलाइन (इंटरनेट) तिकीट यंत्रणा १९ ऑगस्ट रोजी टप्प्याटप्यांत बंद ठेवण्यात येईल. दुपारी सव्वादोन ते सव्वातीन वाजेपर्यंत आरक्षण उपलब्ध नसेल. तर रात्री पावणेअकरा ते मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत बंद राहील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मध्यरात्री साडेबारानंतर मात्र आरक्षण सेवा पुन्हा उपलब्ध होईल.