किनारपट्टीवरील जिल्ह्यंत बुधवारी आणि गुरुवारीही अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यंत काही ठिकाणी अतिवृष्टी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यत अतिवृष्टी, मुंबईत मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात राज्याच्या उत्तरेस तयार झालेली चक्रवाती वर्तुळाकार स्थिती (सायक्लोनिक सक्र्युलेशन) दक्षिणेकडे सरकत असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

सोमवारी दिवसभर किनारपट्टीवर सर्वच जिल्ह्यंत मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली, मात्र रात्री उशिरापासून ते मंगळवारी पहाटेपर्यंत संपूर्ण किनारपट्टीला अनेक ठिकाणी पावसाने झोडपले. काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. हवामान विभागाच्या मुंबईतील सांताक्रूझ केंद्रावर मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासातील नोंदीनुसार २६८.६ मिमी, तर कुलाबा केंद्रावर २५२.२ मिमी पाऊस पडला. वरळी आणि मालाड परिसरात ३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत सर्वच ठिकाणी ११५ मिमीपेक्षा अधिक म्हणजेच अतिमुसळधार पाऊस सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेपर्यंत झाला.

मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर मर्यादित राहिला. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यत मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. दिवसभर अनेक ठिकाणी जोरदार वारे होते. मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या नोंदीनुसार सांताक्रूझ केंद्रावर २९.३ मिमी, कुलाबा केंद्रावर १० मिमी, ठाणे- २३.६ मिमी अशी पावसाची नोंद झाली.  डहाणू येथे २०९.३ मिमी (अतिवृष्टी), रत्नागिरी ११२.४ मिमी (मुसळधार) पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यत मध्यम स्वरुपाचा पाऊस दिवसभर पडला. सायंकाळी उशिरा मीरा—भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता.