News Flash

राज यांच्याकडून दरेकर बंधूंना बाहेरचा रस्ता!

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याचे काम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाती घेतले आहे.

| December 12, 2014 03:08 am

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याचे काम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे पक्षातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना झटका देण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापुढे माजी आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह ज्यांचे राजीनामे पक्षाने स्वीकारले आहेत त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, असा फतवा राज यांनी गुरुवारी काढला. प्रवीण दरेकर यांचे बंधू व नगरसेवक प्रकाश दरेकर यांना आज कृष्णकुंज येथील नगरसेवकांच्या बैठकीतून बाहेर काढून पक्षाशी बंडखोरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असेही राज यांनी स्पष्ट केले.
कृष्णकुंज येथे मुंबईतील नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकांना अपेक्षित असलेल्या कामांवर भर द्या, असे आदेश देतांनाच शनिवारी मुंबईतील नगरसेवकांना नाशिक येथे पुन्हा बैठकीसाठी येण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. ज्यांनी राजीनामे दिले यांच्याशी मी पाश तोडले असून तुम्हीही संपर्क ठेवू नका, असेही त्यांनी स्पष्ट केल्यामुळे प्रवीण दरेकर, वसंत गिते आणि चांडक यांना बाहेरचा रस्ता दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेच्या स्थापनेच्याच वेळी नव्हे तर शिवसेनेत असतानाही ज्यांनी राज यांना सर्वार्थाने साथ दिली त्यांच्यावरच जर पक्षातून हद्दपार होण्याची वेळ येणार असेल तर यापुढे कोण प्रामाणिकपणे काम करेल, असा सवाल काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. यापूर्वी पुण्यात दीपक पायगुडे यांनाही अशीच सापत्न वागणूक राज यांनी दिली होती. नाशिकमध्ये वसंत गिते यांनी मनसेच्या वाढीसाठी सर्व ताकद लावल्यानंतर त्यांना जी किंमत देण्यात आली अशी वागणूक बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्याही शिवसैनिकाला कधी दिली नव्हती, असे ही या पदाधिकाऱ्याने सांगितले.
उत्तर मुंबईतील विभाग अध्यक्षांना बोलावून राज यांनी यापुढे प्रवीण दरेकर यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क न ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  
राज यांच्या सोयीसाठीच मी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. यात पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नव्हता. रोज मनसेच्या शाखेत काम करत असताना राज यांनी जर असा फतवा काढला असेल तर तो दुर्दैवी म्हणावा लागेल. मात्र अद्याप माझा या गोष्टीवर विश्वास नाही. राज यांच्या अडीअडचणीच्या प्रत्येकवेळी मी त्यांना मनापासून साथ दिली होती.
-प्रवीण दरेकर, माजी आमदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2014 3:08 am

Web Title: raj thackeray shows exit door to pravin darekar
Next Stories
1 ‘वेब कॅब’ना महाराष्ट्राचे रस्ते बंद!
2 ‘बेस्ट’ प्रवास महागणार
3 आता ‘वांद्रे टू गोवा’!
Just Now!
X