06 July 2020

News Flash

मनसेला रामटोला!

‘ब्लू प्रिंट’ प्रसिद्ध होण्यास होत असलेल्या विलंबामुळे मनसे कार्यकर्त्यांत आधीच अस्वस्थता असताना पक्षाचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी गुरुवारी ‘रामराम’ ठोकला.

| September 19, 2014 03:41 am

‘ब्लू प्रिंट’ प्रसिद्ध होण्यास होत असलेल्या विलंबामुळे मनसे कार्यकर्त्यांत आधीच अस्वस्थता असताना पक्षाचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी गुरुवारी ‘रामराम’ ठोकला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पुणे येथील जाहीर सभेत राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही अलीकडेच अन्य पक्षांत धाव घेण्यास सुरुवात केल्याने मनसेला मोठा झटका बसला आहे.  
राम कदम यांनी विधिमंडळात पोलीस अधिकाऱ्याला केलेली मारहाण तसेच त्यांच्या पक्षविरोधी कारवाया लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी न देण्याकडे राज ठाकरे यांचा कल होता. या साऱ्याची कल्पना असल्यामुळे गेले महिनाभर राम कदम हे भाजपशी संधान साधून होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार पूनम महाजन यांचा पराभव केला होता.  युतीमध्ये घाटकोपर विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाटय़ाचा असल्यामुळे दिल्लीतील भाजप नेत्यांशी संपर्क करून त्यांनी आज भाजपप्रवेश केला. या प्रवेशात भाजपचे सरचिटणीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मनसेला मोठा झटका बसल्याची पदाधिकाऱ्यांची भावना आहे.

मनसेने राम कदम यांना भरभरून देऊनही त्यांनी पक्षाशी केलेली गद्दारी त्यांना विधानसभा निवडणुकीत महागात पडेल. घाटकोपरमधील जनता ही दगाबाजी कधीही सहन करणार नाही. मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली तेव्हा त्यांचाही पराभव झाला होता.
– बाळा नांदगावकर, मनसे गटनेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2014 3:41 am

Web Title: raj thackerays mns mla ram kadam join bjp
Next Stories
1 एसटीचा फुड मॉल थांबा लवकरच अधिकृत
2 लघुशंकेसाठी एक रुपया मोजा!
3 मंगळयानासोबत सेल्फी!
Just Now!
X