मुंबई : परखड भूमिका घेणाऱ्या कलाकार म्हणून ज्ञात असणाऱ्या तसेच हिंदी, इंग्रजी आणि गुजराती रंगभूमीसह मोठा पडदा गाजविणाऱ्या रत्ना पाठक-शाह यांच्याशी रविवारी ‘लोकसत्ता गप्पा’ची संवाद मैफल रंगणार आहे. पडद्यावरील भूमिकांच्या पलीकडे त्यांचे माणूसपण, त्यांची वैचारिक जडणघडण, सामाजिक भूमिका या मंचावरून समोर येणार आहे. अभिनेते-रंगकर्मी मकरंद देशपांडे त्यांच्याशी संवाद साधतील.

कारकीर्दीत अनोखा ठसा उमटवणारे कलावंत, लेखक ‘लोकसत्ता गप्पा’मधून वाचकांना यापूर्वी भेटले आहेत. ख्यातकीर्त साहित्यिक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक-संगीतज्ञ-लेखक पं. सत्यशील देशपांडे, भारतीय अभिजात संगीतात सर्जनशील ठसा उमटविणारे पं. मुकुल शिवपुत्र, प्रतिभावंत लेखक-शायर जावेद अख्तर, हृदयस्पर्शी गीतकार गुलजार, प्रख्यात कलावंत नसिरुद्दीन शाह, क्रिकेट समालोचक हर्षां भोगले यांच्याशी याआधी ‘लोकसत्ता गप्पा’ची संवाद मैफल रंगली होती. आता रत्ना पाठक-शाह यांच्यासोबत १६ फेब्रुवारी रोजी ‘लोकसत्ता गप्पा’चे नवे पर्व रंगणार आहे.

हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन माध्यम आणि रंगभूमीवर गेली ३५ वर्षांहून अधिक काळ रत्ना कार्यरत आहेत. जवळपास तीन पिढय़ा त्यांच्या अभिनयकौशल्याचा आनंद घेत आहेत. ऐंशीच्या दशकात आलेल्या समांतर चित्रपटांच्या लाटेत त्यांच्या भूमिका गाजल्या. हिंदीबरोबरच इंग्रजी, गुजराती रंगभूमीवरही त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. ‘पहेली’, ‘जाने तू या जाने ना’, ‘खुबसूरत’, ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ ते अगदी  अलिकडच्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’सारख्या धाडसी चित्रपटांतील त्यांचा अभिनय लक्षात राहणारा आहे. बाजारपेठेच्या लाटेत वाहून न जाता त्यांनी निवडलेल्या आव्हानात्मक, धाडसी भूमिका कायम चर्चेत राहिल्या आहेत. छोटय़ा पडद्यालाही त्यांनी कमी लेखले नाही. ‘इधर उधर’, ‘तारा’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा मालिकांमधून त्या घराघरांत पोहोचल्या.

सहप्रायोजक : झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एस.आर.ए) आणि एम. के. घारे ज्वेलर्स

बँकिंग पार्टनर : ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड