शैलजा तिवले

एमडीआर केंद्रावर ‘बेडाक्युलीन’ उपलब्ध

औषधांना दाद न देणाऱ्या (एमडीआर) क्षयरोगाने ग्रासलेल्या धारावी भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. एमडीआर क्षयरोगावर प्रभावी ठरणारे आणि कमीत कमी दुष्परिणाम असलेले ‘बेडाक्युलीन’ औषध आता धारावीच्या एमडीआर केंद्रांवर उपलब्ध झाले आहे.

क्षयरोगाने गंभीर स्वरूप धारण केले असून एमडीआरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तब्बल ४० वर्षांनंतर या आजारावर शोधण्यात

आलेले ‘बेडाक्युलीन’ हे औषध प्रभावी असल्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आणि २०१६ पासून या औषधाचा भारतात वापर सुरू झाला. या प्रकारच्या क्षयरोगामध्ये दोन वर्षे औषधोपचार घ्यावे लागतात. यात इंजेक्शनचाही समावेश असतो. त्यामुळे अनेक रुग्ण कंटाळून उपचार अर्धवट सोडून देतात. या औषधांमुळे बहिरेपणा, दृष्टी कमी होणे अशा गंभीर समस्याही उद्भवतात. त्यामुळे त्यांना ‘बेडाक्युलीन’ औषध त्यांच्यासाठी दिलासादायक ठरले आहे.

सध्या हे औषध केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहे. अधिकाधिक एमडीआर रुग्णांसाठी हे उपलब्ध व्हावे, यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे.

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय आणि गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात रुग्णांना दाखल न करता बाह्य़रुग्ण तत्त्वावर हे औषध दिले जात आहे, त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत.

धारावीमध्ये एमडीआरच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गतवर्षी तिथे स्वतंत्र एमडीआर केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामध्येही आता बाह्य़रुग्ण तत्त्वावर बेडाक्युलीन देण्यास सुरुवात झाली आहे. सध्या एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. आवश्यक तपासण्या आणि देखरेख डॉक्टर करत असल्याची माहिती पालिकेच्या क्षयरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

उपनगरीय रुग्णालयांमध्येही उपलब्ध

भाभा (कुर्ला), राजावाडी (घाटकोपर) आणि शताब्दी (कांदिवली) या रुग्णालयांमध्येही स्वतंत्र क्षयरोग बाह्य़रुग्ण विभाग कार्यरत होत असून याचा पुढचा टप्पा म्हणून तिथे बेडाक्युलीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.