13 July 2020

News Flash

सोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार?

दोन्ही काँग्रेसमध्ये शिवसेनेवरून वेगळे मतप्रवाह

(संग्रहित छायाचित्र)

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्याबाबत निर्माण झालेल्या पेचावर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात उद्या होणाऱ्या भेटीनंतर काही तरी तोगडा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यावरून काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीतही वेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्यावरून अजूनही काँग्रेसमध्ये निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीमध्येही शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्याबाबत वेगेवगेळ मतप्रवाह आहेत. भाजपला सत्तेपासून दूर राखण्याकरिता एकत्र आले पाहिजे, अशी भावना काँग्रेस आमदारांनी व्यक्त केली. तर राष्ट्रवादीतील काही नेते लवकर तिढा सुटला पाहिजे यावर आग्रही आहेत. या पाश्र्वभूमीवर शरद पवार हे उद्या नवी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यावरून काँग्रेसचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू आहे. शरद पवार यांच्या भेटीतून काही तरी तोडगा निघेल, असा आशावाद व्यक्त केला जातो. या घोळास राष्ट्रवादीकडून काँग्रेसला दोष दिला जात असतानाच, काँग्रेसकडून राष्ट्रवादीबाबत साशंकता व्यक्त केली जाते. राष्ट्रवादीतही भाजपला मदत करावी, असे काही नेत्यांचे मत आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यात पर्यायी सरकार स्थापन होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीवर या दृष्टीने दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यात राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसच्या दिल्लीतील भूमिकेबद्दल चर्चा करण्यात आली.

सोनिया गांधी यांनी अनुकूलता दर्शविली तरच शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकता येईल, असा राष्ट्रवादीत मतप्रवाह आहे. सत्ता स्थापन करू हा भाजपकडून सातत्याने करण्यात येणारा दावा, अन्य पक्षातील आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न, काँग्रेस आमदारांमधील अस्वस्थता यावरही राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली.

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते चर्चा करतील, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत जाणे म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ – जयंत पाटील

पुणे: भारतीय जनता पक्षाची विचारधारा वेगळी असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपबरोबर जाणार नाही. दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने शिवसेनेबरोबर जाण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पुण्यात दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, आम्ही मेगा भरती नव्हे, तर मेरिटवर भरती करू, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 1:14 am

Web Title: separate opinion from shiv sena in both congress abn 97
Next Stories
1 ‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी
2 दैनंदिन समस्यांवर विद्यार्थ्यांची कल्पक उत्तरे
3 ‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड
Just Now!
X