राणीच्या बागेत पेंग्विनचे आगमन झाल्यानंतर आता या मुद्द्यावरून राजकारणाला सुरूवात झाली आहे. केवळ आदित्य ठाकरे यांचा बालहट्ट पुरविण्यासाठीच हे पेंग्विन आणण्यात आल्याची टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह विरोधकांनी सुरू केली आहे. शिवसेना ५० वर्षांची झाली तरी अजूनही पाच वर्षाच्या लहान मुलासारखी वागत आहे. आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी मुंबईत नाईट लाईफ आणि ओपन जीमची टुम काढली होती. राणीच्या बागेत पेंग्विन आणणे, हा आदित्य ठाकरेंच्या नाटकाचा तिसरा अंक आहे, अशी टीका नितेश यांनी केली. मनसे आणि काँग्रेसनेही या मुद्द्यावरून आदित्य यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आपली हौस पूर्ण करायची असल्यास ती स्वत:च्या खिशातील पैशांतून करावी. मुंबईकरांच्या खिशात कशाला हात घालता, असा टोला मनसेने लगावला आहे.
राणीच्या बागेत ‘काळे कोट’वाले दरबारी! 
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याची कल्पना मांडली होती. पेंग्विनना उणे तापमानात ठेवावे लागते. मुंबईतील उष्ण तापमानाचा विचार करता हे पेंग्विन जास्तीत जास्त दोन वर्ष जगू शकतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ही वस्तुस्थिती पालिकेला माहित असूनही केवळ आदित्य ठाकरे यांचा बालहट्ट पुरविण्यासाठी पेंग्विन आणण्यात आले, असा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. या पेंग्विन्सच्या देखभालीसाठी नेमलेल्या ऑस्टेलियन एजन्सीला ८ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. तसेच पेंग्विनसाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी ७ ते ८ कोटी असा एकूण १४ ते १५ कोटी खर्च होतो आहे.