मान्यवरांच्या यादीत योग्य स्थान नसल्याने शिवसेना लोकप्रतिनिधींची नाराजी

रेल्वेराज्यमंत्र्यांची कार्यक्रमात जाहीर माफी * पहिल्याच दिवशी वातानुकूलितमधून १३ हजार रुपये महसूल

मुंबई : मध्य रेल्वेवरील पहिल्या वातानुकूलित लोकलच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी चांगलेच मानापमान नाटय़ रंगले. महापौर, शिवसेना खासदार यांना निमंत्रण पत्रिकेत योग्य स्थान न मिळाल्याने आणि कार्यक्रमस्थळी फलकावर लोकप्रतिनिधींचा उल्लेख नसल्याने रेल्वेमंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त करण्यात आली.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना भर कार्यक्रमात माफी मागण्याशिवाय पर्याय राहिला नाही. लोकप्रतिनिधींच्या योग्य सूचनांचा आदर राखला जाईल, असे आश्वासन यावेळी रेल्वेराज्यमंत्र्यांना द्यावे लागले. पहिल्याच दिवशी वातानुकूलित लोकलमधून तिकीट काढून १०० पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केल्याने १२ हजार रुपये महसूल मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

मध्य रेल्वेच्या पहिल्या वातानुकूलित लोकल गाडीला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते सीएसएमटी येथील एका कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखविण्यात आला. गुरुवारी ही लोकल पनवेल ते ठाणे धावली. कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेच्या निमंत्रण पत्रिकेत आणि मंचावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना योग्य स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. रेल्वेच्या कार्यक्रमांत अधिकाऱ्यांकडून वारंवार लोकप्रतिनिधींचा अपमान केला जात असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

खासदार संसदेत रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मांडतात आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मागे लागून कामे करून घेत असतात. मात्र त्यांचा आदर केला जात नसल्याची खंत व्यक्त केली. रेल्वेच्या प्रत्येक उद्घाटनासाठी रेल्वेमंत्र्यांनीच का यावे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्या सुविधांचा प्रारंभ करावा, अशी मागणी त्यांनी केल्याने उपस्थित अवाक झाले. यानंतर रेल्वे राज्यमंत्र्यांनी माफी मागून लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आदर करण्याचे आश्वासन दिले.

वातानुकूलित लोकल पहिल्या दिवशीच उशिरा

ट्रान्स हार्बरवरील मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलला दुपारी ३.०१ वाजता हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. परंतु रेल्वे राज्यमंत्र्यांना बेळगावहून मुंबईत येण्यास उशीर झाला आणि त्यामुळे लोकल उशिरा म्हणजे ३.४७ वाजता रवाना करण्यात आली. पहिल्याच दिवशी १०० पेक्षा जास्त तिकीट काढून प्रवाशांनी प्रवास केला. यातून १२ हजार रुपयांपेक्षा जास्त महसूल रेल्वेला मिळाला. वातानुकूलित लोकलबरोबरच १२ रेल्वे स्थानकांवरील १३ पादचारी पुलांचे लोकार्पण तसेच अन्य प्रवासी सुविधांचेही लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

सावंत यांनी कर्जत ते खोपोली आणि कसारापर्यंत अडीच तास प्रवासांत काढावे लागत असल्याचे सांगतानाच महिला प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल डब्यात टॉयलेटची व्यवस्था करावी, याशिवाय बीपीटीचा मालगाडीचा मार्ग मानखुर्दपर्यंत ब्रॉडगेज असल्याने त्यावरून लोकल ट्रेन चालवून उपनगरीय सेवेचा भार हलका करावा अशी मागणीही केली.

फुकटय़ा प्रवाशांविरोधात कारवाई

वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट किंवा प्रथम श्रेणीच्या पासावर प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के.के.अशरफ यांनी सांगितले. त्यासाठी शुक्रवारपासून तिकीट तपासणीसांना सोबत घेऊन विशेष मोहीमही घेतली जाणार आहे.