मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे आणि अन्य महापालिकांच्या क्षेत्रात पुन्हा सरसकट टाळेबंदी नको, अशी भूमिका स्थानिक नेते-नागरिक घेत असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीच्या निर्णयाबाबत स्थानिक प्रशासनाची पाठराखण केली आहे. टाळेबंदीमुळे करोना नियंत्रणात येईल, अशी खात्री असेल तर विश्वासाने निर्णय घ्या, कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका, अशा शब्दांत गरजेनुसार पुन्हा टाळेबंदी लागू करण्यास मुख्यमंत्र्यांनी सूचक होकार दर्शवला.

मुंबई महानगर प्रदेशातील आणि राज्यातील अनेक भागांत जाहीर केलेल्या स्थानिक टाळेबंदीची मुदत एक-दोन दिवसांत संपत आहे. त्यामुळे पुन्हा सरसकट टाळेबंदी नको, रुग्ण सापडणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातच टाळेबंदी लागू करावी, अशी भूमिका नागरिकांबरोबरच आता राजकीय पक्षही घेऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांशी दूरचित्रसंवादाद्वारे संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. शहरी भागातील करोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

सरकारने चाचणी केंद्रे १३० पर्यंत वाढवली आहेत. धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवरील बंदी कायम ठेवली आहे. सणवार साजरे करताना नवे प्रतिबंधित क्षेत्र वाढू नये. काही दिवसांपूर्वी धारावीच्या प्रारूपाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. हे संकट किती भीषण आहे आणि त्याला राज्य सरकारने कसे तोंड दिले हेही आपण नागरिकांना विश्वासात घेऊन मोकळेपणाने सांगितले आहे. धारावीचे प्रारूप राबवून राज्यात इतरत्रही संसर्ग नियंत्रणात आणता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

खर्चावरही नियंत्रण आवश्यक!

प्रत्येक जिल्ह्य़ातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रांवर सर्व सुविधा असाव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयांच्या ठिकाणी अधिकारी नेमावेत आणि अवाच्या सवा खर्च लावला जाणार नाही हे कटाक्षाने पाहावे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयांत त्रास होऊ नये, डॉक्टरांनी रुग्णांविषयी नातेवाईकांना व्यवस्थित माहिती द्यावी. विश्वस्त संस्थेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १० टक्के रुग्णांवर मोफत उपचार देणे बंधनकारक आहे, त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही ते पाहावे, अशा सूचना राजेश टोपे आणि अमित देशमुख यांनी केल्या.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी व्हावी. रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव अशा शहरांमध्ये अधिकाधिक ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करावी, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले. सध्या राज्यात ५ हजारपेक्षा जास्त कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) आहेत, पण ५४० रुग्णच कृत्रिम श्वसन यंत्रणेवर आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. औरंगाबाद, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये रुग्णांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या करा, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी केली.

अधिकाऱ्यांना सूचना

* टाळेबंदीचा उपयोग रुग्ण आणि जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचार मिळणे आणि त्यातून मृत्यूप्रमाण कमी करण्यासाठी व्हावा.

* जिल्ह्य़ातील सर्व नागरिकांचा सहभाग घेऊन संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा.

* टाळेबंदी लावून करोनाला नियंत्रित करता येईल अशी खात्री असेल तर विश्वासाने, पण तारतम्याने निर्णय घ्या.

* प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करावे. सरकारच्या वेळोवेळी सूचना येतात, प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये.