महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे आधीच गंभीर स्थिती आहे. त्यात करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेणं सर्वसामान्यांना परवडत नाहीय. मुंबईसह महाराष्ट्रात करोना बाधितांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारली जात आहेत.

रुग्णालयांची लाखो रुपयांची ही बिल भरणं सर्वसामान्यांना परवडत नाहीय. हाच मुद्दा पकडून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

आणखी वाचा- बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक तर अधिपरिचारिकांना दुसरा न्याय!

“खासगी रुग्णालयांकडून सर्वसामान्यांचे शोषण सुरु आहे. ही बनवाबनवी थांबवून तात्काळ कृती करा” अशी मागणी त्यांनी केली आहे”. पीपीई कीट, कोविड व्यवस्थापन आणि अन्य चार्जेसच्या नावाखाली ही महागडी बिले आकारली जात आहेत. हे असे प्रकार तात्काळ रोखण्यासाठी पावले उचलण्याची त्यांनी मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेला पूर्ण कल्पना आहे, त्यांनी फक्त बेड चार्जेस निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयांना अपारदर्शक, अव्वाच्या सव्वा बिल आकारायला मुभा दिली आहे, असे सोमय्या यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. त्यांनी आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा- नोकरीची संधी: मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची हंगामी भरती; ३० हजार रुपये ठोक मानधन

किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्रात एका रुग्णाच्या नातेवाईकाला १८ लाख रुपये बिल आकारण्यात आल्याचे उदहारण दिले आहे. त्याशिवाय रिक्षावाला, छोटया व्यापाऱ्याला लाखो रुपयाचे बिल आकारण्यात आल्याचे उदहारणही त्यांनी दिले आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या टि्वटमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.