सफाई कामगाराच्या मागणीने स्टेट बँकेचे अधिकारी निरुत्तर

नोटा रद्दीकरणाच्या मोहिमेमुळे सामान्य जनतेमध्ये खदखदणाऱ्या नाराजीला आता वेगवेगळ्या मार्गानी तोंड फुटू लागले आहे. एका बाजूला, नोटा बदलून घेण्यासाठी रोजगार बुडवून रांगेत उभे रहावे लागते, तर दुसरीकडे विजय मल्यासारखा बुडव्या कोटय़वधी रुपये बुडवून देशाला ठेंगा दाखवितो. आता घरात पैसा नसल्याने मलाही माल्याप्रमाणे कर्जमाफी द्या, असे पत्र त्र्यंबकेश्वर पालिकेचे सफाई कामगार भाऊराव सिताराम सोनवणे यांनी स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यास दिले आणि या कर्जदाराचे शंकानिरसन कसे करायचे या चिंतेने बँकेचे कर्मचारी हतबल झाले.

काल नोटाबदलासाठी बराच वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर सोनवणे यांनी उद्विग्न अवस्थेत घर गाठले. अशातच, स्टेट बँकेने बुडित कर्जाची कोटय़वधींची रक्कम माफ करायचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. सोनवणे तडक उठले, आणि त्यांनी एका  परिचिताला गाठून बँकेच्या शाखाधिकाऱ्याच्या नावाने कर्जमाफी देण्याची विनंती करणारा अर्जही लिहून घेतला.

‘मी आपल्या बँकेचा खातेधारक असून या बँकेकडून मी दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आहे. स्टेट बँकेने उद्योगपती विजय माल्या यांचे १२०१ कोटींचे कर्ज माफ केल्याची बातमी मी वर्तमानपत्रात वाचली. ही बाब अत्यंत चांगली आहे. मी तर एक अत्यंत गरीब घरातून असून नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून काम करतो. ज्या अर्थी आपली बँक मोठय़ा उद्योगपतीचे कर्ज माफ करते त्याच धोरणानुसार माझे दीड लाख रुपयांचे कर्जही माफ करण्यात यावे’ अशी विनंती करणारा अर्ज त्यांनी बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडे सुपूर्द केले, आणि उत्तराच्या अपेक्षेने सोनवणे त्यांच्यासमोर उभे राहिले.

आम्ही तुमचा अर्ज पुढील निर्णयाकरिता वरिष्ठांकडे पाठवितो, असे आश्वासन बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपणास दिले आहे, असे सोनवणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. माल्याने नीतिमत्तेला पाने पुसली, म्हणून त्याने कर्ज बुडविले, असे सांगून या अधिकाऱ्याने आपली समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांच्या लेखी उत्तराची वाट पाहात आहे, असे सोनवणे म्हणाले.