सध्या देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, दिल्लीत पार पडलेल्या तबलिगी समाजाच्या कार्यक्रमानंतर करोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचं समोर आलं होतं. कार्यक्रमानंतर काही लोक महाराष्ट्रातही आले होते. यापैकी काही जणांनी क्वारंटाइन होणं टाळलं होतं. त्यानंतर आता मुंबईत त्यापैकी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात तबलिंगींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लोकांनी दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला गेलेल्या लोकांनी तात्काळ पोलीस अथवा प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं होतं. परंतु त्यानंतरही काही जणांनी आपली माहिती लपवली होती. त्यानंतर त्यांच्यार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, दिल्लीहून परतलेल्या तबलिगींना शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष टीमही तयार केल्या होत्या.
­­­­
तबलिगी मकरजला गेलेल्या लोकांमुळे मुंबई आणि राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं चित्र समोर आले आहे. दिवसागणिक ही आकडेवारी वाढतच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका करोनाग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपाचर करत आहे. मरकज येथे गेलेल्या लोकांमुळे इतरांना करोनाची लागण होऊ नये या उद्देशानं पालिकेनं ट्विट करत दिल्लीला कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. जर प्रवासाची माहिती दिली नाही तर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पालिकेनं स्पष्ट केले होतं. करोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी रूग्णांची अथवा रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवून त्यांना विलगीकरण कक्षात अथवा अलगीकरणाक ठेवणं हा एकमेव उपाय असल्याचंही सांगण्यात आलं होतं.