नैसर्गिक घटनांमधील कार्यकारणभाव, पर्यावरण, जैवविविधता याविषयी जाणीवजागृती या बरोबरच उदारमतवाद, प्रयोगशीलता, साधकबाधक विचार करण्याची क्षमता विज्ञान व गणित या विषयाच्या अध्ययनामुळे मुलांमध्ये विकसित होत असते. परंतु, हे विषय शिकविण्याची सध्याची पध्दत कंटाळवाणी व कालबाह्य़ झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांनाही या विषयांमध्ये रस वाटेनासा झाला आहे. म्हणूनच या विषयांकरिता विशेष ‘शिक्षक विकास संस्था’ सुरू करून अध्यापनाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे, असा सूर आधुनिक भारतातील शिक्षणापुढील आव्हाने या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
‘सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस’चे हेमचंद्र प्रधान यांनी विज्ञान-गणित शिक्षण यावर विवेचन करताना प्रामुख्याने ही मागणी केली. एनसीएफ-२००५ आणि एनसीएफटीई-२०१० यांचा संदर्भ घेत विज्ञान-गणित या विषयांच्या अध्ययनात कोणते बदल व्हायला हवेत, हे त्यांनी अधोरेखित केले. ‘या दोन आराखडय़ांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीच्या दप्तराच्या ओझ्याबरोबरच अवांतर पाठांतराचा असलेला बोझाही कमी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार अभ्यासक्रम बदलले. मात्र शिक्षकांची अध्यापनाची पध्दती बदलली नाही. नव्या व्यवस्थेत शिक्षक हा ‘शिकविणारा’ या संकल्पनेलाच फाटा देण्यात आला आहे. त्याऐवजी शिक्षक हा ‘शिकण्याची’ संधी उपलब्ध करून देणारा असावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षणातला हा नवा दृष्टीकोन आत्मसात करण्यासाठी शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.
विज्ञान-गणितामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुराव्याधारित असलेले विरूध्द दृष्टीकोन स्वीकारण्याची वृत्ती, प्रयोगशीलता, प्रसारमाध्यमे, सरकारी निर्णय, जाहिराती यांवर साधकबाधक विचार करण्याची कुवत विकसित होते. त्यांचे महत्त्व लक्षात आल्यानेच कोठारी आयोगाने हे दोन विषय शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ते झालेही. मात्र, हे विषय शिकविण्याची सध्याची पध्दत ही विद्यार्थ्यांमध्ये या विषयांविषयी आवड निर्माण करणारी नाही. त्याकरिताच शिक्षकांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तंत्रज्ञान व्हिजन-२०३५ याचा शिक्षणाच्या संदर्भात विचार करताना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. वरूण साहनी यांनी आणखी २० वर्षांनी भारतीय समाजातील संभाव्य घटक कोणकोणते असतील हे स्पष्ट केले. शेती, नवनिर्मिती, सेवा क्षेत्र, वृध्द, गळतीमुळे शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडलेले अशा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना रोजगाराचे कसेकसे पर्याय उपलब्ध होऊ शकतील, याची मांडणी त्यांनी केली.
महिंद्र इकोल सेंट्रलचे संचालक प्रा. संजय धांडे यांनी शैक्षणिक संस्थांनी अध्यापनाबरोबरच संशोधन, त्या आधारे बौद्धिक संपदा, उद्योजकता, उत्पादनाचे नवनवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठीही कार्यरत होण्याची गरज व्यक्त केली. तर नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी सध्याच्या विद्यापीठीय व्यवस्थेत शैक्षणिक बदल करताना काय अडचणी येतात याची जाणीव करून दिली. तसेच, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानाअंतर्गत कौशल्य विकासावर भर देऊन आपल्याला उच्च शिक्षणाचा चेहरामोहरा बदलता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी या परिसंवादाचे अध्यक्षपद भूषविले.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण