शिक्षक आमदारांची निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा

परीक्षेचे काम असलेल्या शिक्षक-प्राध्यापकांना केंद्र प्रमुख, झोनल अधिकारी, मतदार याद्या तपासणी व छाननी व तत्सम जबाबदाऱ्या देऊन दीर्घकाळ निवडणुकीचे काम देऊ नये, अशी मागणी शिक्षक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार आणि उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेऊन केली.

परीक्षेची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना देण्यात आलेल्या निवडणुकीच्या कामांमुळे परीक्षा व निकालांवर परिणाम होऊन त्यात विलंब होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना शक्यतो निवडणुकीच्या कामाला जुंपू नये, अशी शिक्षक आमदारांची मागणी आहे. तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या मते मतदान व मतमोजणीच्या वेळी केवळ चार-पाच दिवसच काम दिले जाते, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र केंद्र प्रमुख, झोनल अधिकारी यासह मतदार याद्या अद्ययावत करणे व अन्य कामांसाठी शिक्षकांच्या सेवा दोन महिन्यांसाठी मिळण्याबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. राज्यभरातही तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शिक्षक संघटनांकडून विरोध दर्शविला जात आहे व निवेदने देण्यात येत आहेत. या प्रकरणी योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन अश्विनी कुमार यांनी पाटील यांना दिले.