10 August 2020

News Flash

वृक्षांना वाळवीचा विळखा

पावसाळ्यानंतरच कार्यवाही

माउंट मेरी रोडवरील १८९ झाडांपैकी ४९ झाडांना वाळवी; पावसाळ्यानंतरच कार्यवाही

पावसाच्या पहिल्याच आठवडय़ात शहरातील ६०० पेक्षा अधिक झाडांची पडझड झालेली असतानाच वांद्रे येथील माउंट मेरी रस्त्यावरील १८९ झाडांपैकी तब्बल ४९ झाडांना वाळवी लागल्याचे स्थानिकांना आढळून आले आहे. झाडांची छाटणी करण्यासाठी लोक विरोध करतात असे सांगत बुंध्यापर्यंत झाडे कापणाऱ्या पालिकेने माउंट मेरी रस्त्यावरील वाळवी लागलेल्या झाडांवर उपचार करण्यासाठी पावसाळ्यानंतरचा मुहूर्त शोधला आहे. मात्र समुद्रालगत असलेल्या या रस्त्यावर सोसाटय़ाचा वारा येत असल्याने या झाडांची पडझड होण्याची भीती स्थानिकांना वाटत आहे.

वांद्रे येथील माउंट मेरी चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजवीकडे असलेल्या पहिल्याच इमारतीसमोरील – विंध्याचलसमोरील पिंपळाच्या झाडाची एक मोठी फांदी जानेवारीत खाली झुकली आणि वाऱ्यासोबत हलताना आवाज येऊ लागला. स्थानिकांनी याबाबत तातडीने वॉर्ड कार्यालयाशी संपर्क साधला. पालिकेकडून ही फांदी तोडण्यात आली, मात्र त्यावेळी या झाडाला वाळवी लागल्याचे स्पष्ट झाले. आजुबाजूच्या काही झाडांनाही वाळवी लागल्याचे समजल्यावर येथील जागरूक व तत्पर असलेल्या प्रगत परिसर व्यवस्थापनाने या रस्त्यावरील सर्वच झाडांची पाहणी करून घेण्याचे ठरवले. मे महिन्यात पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया संस्थेला हे काम दिल्यावर त्यांनी केलेल्या पाहणीत या रस्त्यावरील १८९ पैकी तब्बल ४९ झाडांना वाळवी लागल्याचे स्पष्ट झाले. ४९ झाडांवरील वाळवीवर उपचार करण्यासाठी या खासगी कंपनीने  ७० हजार रुपये खर्च येण्याचे सांगितले आहे. मात्र वाळवी वेगाने पसरत असल्याने रस्त्यावरील सर्वच झाडांवर उपचार करण्यासाठीदोन लाख २३ हजार एवढा खर्च अपेक्षित आहे.  ही सर्व झाडे रस्त्यांवरील असल्याने आम्ही पालिकेशी संपर्क साधला. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी या झाडांची पाहणी केली. वाळवीवर उपचार करण्यासाठी झाडांच्या मुळाशी मातीत रासायनिक औषध घालावे लागेल. मात्र पावसात हे औषधोपचार करता येत नाहीत, त्यामुळे हे उपचार पावसाळ्यानंतर केले जातील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे प्रगत परिसर व्यवस्थापनाच्या (एएलएम) प्रमुख मारिया डिसूजा म्हणाल्या. मात्र समुद्रानजीक पावसाळ्यात वाऱ्यांचा वेग वाढतो, त्यामुळे ही झाडे कितपत तग धरतील अशी भीती स्थानिकांच्या मनात आहे. यावर तातडीने उपाय शोधायला हवा, अशी मागणी स्थानिक करत आहेत. वड, पिंपळ, नारळांची संख्या अधिक आहे. पावसाळ्यापूर्वी या झाडांची छाटणी केली जाते. मात्र ही छाटणी करताना स्थानिक उभे राहून मोठय़ा फांद्या कापल्या जाणार नाही, एका बाजूनेच छाटणी होणार नाहीत, अशी काळजी घेतात, असे मारिया डिसूजा म्हणाल्या.

तक्रारींचे उद्या पाहू, नंतर पाहू

झाडांबाबत पालिकेचे निश्चित धोरण नाही. पालिकेचा उद्यान विभाग संपूर्ण शहरातील झाडांची पाहणी करणार होता. वांद्रे येथील स्थानिकांनी  पुढाकार घेऊन रस्त्यावरील झाडांची पाहणी केली. त्याबद्दल वॉर्डकडे तक्रार केली तर उद्या पाहू, नंतर करू अशी उत्तरे दिली जातात. अशा स्थितीत शहरातील झाडे पडली तर त्याला सर्वस्वी पालिका जबाबदार आहे, असे वांद्रे येथील नगरसेवक असिफ झकेरिया म्हणाले.

पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील झाडांची छाटणी केली होती. मात्र दरवर्षी माउंट मेरीच्या जत्रेआधी येथील झाडांची छाटणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येते. स्थानिकांकडून झाडांना वाळवी लागल्याच्या तक्रारी आल्यावर या झाडांची पाहणी केली गेली. त्यातील ८ ते १० झाडांना वाळवी लागली आहे तर इतर २५ ते ३० झाडांना वाळवी लागण्याची सुरुवात झाली आहे. या सर्व झाडांवर उपचार केले जातील,

शरद उघडे, साहाय्यक आयुक्त एच पश्चिम विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2018 2:01 am

Web Title: termite issue on tree
Next Stories
1 रेल्वे यार्डामध्ये सीसीटीव्ही बसवणार!
2 प्रश्न मिटवणारे भय्यू महाराज
3 कर्जबाजारी अवस्थेस पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय जबाबदार
Just Now!
X