07 March 2021

News Flash

मजूर तुटवडय़ाने प्रकल्पांची गती संथ

कामाला वेग आल्यानंतर ही संख्या १६ हजापर्यंत गेली होती. मात्र, मेच्या अखेरीस ही संख्या रोडावू लागली.

संग्रहित छायाचित्र

सुहास जोशी, लोकसत्ता 

मुंबई : शहर आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या पायाभूत सुविधांवरील सुमारे तीन चतुर्थाश मजुरांनी काम सोडून मूळ गावी जाण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकल्पांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात १६ हजापर्यंत असलेली मजुरांची संख्या मे महिन्याच्या अखेरीस साडेतीन हजार  इतकी कमी झाल्याचे ‘एमएमआरडीए’च्या वतीने सांगण्यात आले.

टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात ‘एमएमआरडीए’मार्फत शहरात सुरू असलेली पायाभूत सुविधांची सर्व कामे ठप्प झाली होती. सध्या एमएमआरडीएतर्फे शहरात सहा मेट्रो मार्गिका, मुंबई-पार-बंदर प्रकल्प आणि इतर उड्डाणपूल या कामांचा त्यात समावेश आहे. शहर आणि परिसरात सुरू असणारे सहा मेट्रो मार्गिका प्रकल्पांवर सुमारे पाच हजार, शिवडी ते चिर्ले-मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्पाच्या तीन पॅकेजमध्ये पाच हजार, छेडानगर येथील उड्डाणपूल विस्तार, कलानगर ते वांद्रे वर्सोवा सी लिंक विस्तार उड्डाणपूल असे सर्व एकत्रित मिळून ११ हजार मजूर कार्यरत आहेत. काम ठप्प झाल्यावर या मजुरांची निवास, जेवण तसेच वैद्यकीय अशी सर्व व्यवस्था प्रकल्प स्थळाजवळच करण्यात आली होती. त्याचा खर्च ‘एमएमआरडीए’तर्फे  करण्यात आला होता.

दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या कामांना परवानगी देण्यात आली. त्यानंतर २० एप्रिलपासून ही कामे पुन्हा सुरू झाली. त्यावेळी ‘एमएमआरडीए’च्या सर्व प्रकल्पांवर मजुरांची पूर्ण उपस्थिती होती. कामाला वेग आल्यानंतर ही संख्या १६ हजापर्यंत गेली होती. मात्र, मेच्या अखेरीस ही संख्या रोडावू लागली. शनिवारी केवळ साडेतीन हजार मजूरच उपस्थित असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. मजुरांच्या इतक्या मोठय़ा संख्येने जाण्यामुळे प्रकल्पपूर्तीच्या उद्दिष्टांना फटका बसण्याची शक्यता राजीव यांनी व्यक्त केली.

वर्ष अखेर अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) ही मेट्रो-७ आणि डि. एन. नगर ते दहिसर ही मेट्रो-२ ए मार्गिका कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट होते. टाळेबंदीतील काम बंदमुळे त्याला आधीच फटका बसला होता. आता मजुरांअभावी या मार्गिका आणखी रखडण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 4:18 am

Web Title: the pace of projects is slow due to labor shortage zws 70
Next Stories
1 हायपोथायरॉईड, मधुमेह आणि स्थूलपणा असलेल्या तरुणांना वेळेत उपचार देणे गरजेचे
2 Coronavirus : मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी १३ वरून १६ दिवसांवर
3 विकासकांना मजूरचिंता
Just Now!
X