संशोधनात्मक अभ्यास उपलब्ध नसल्याने आवश्यकता आणि सुरक्षिततेबाबत साशंकता

मुंबई : खासगी रुग्णालयातील अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तिसऱ्या मात्रेची मागणी केली जात आहे. मात्र असे असले तरी तिसरी मात्रा देणे कितपत आवश्यक आणि सुरक्षित आहे याचा संशोधनात्मक अभ्यास जगभरात कुठेच प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे याबाबत शिफारस करणे सध्या योग्य नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जानेवारीत लसीकरण सुरू झाले तेव्हा सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने केले गेले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे लसीकरण होऊन आता जवळपास सात ते आठ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा करोना संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून तिसरी मात्रा देण्याची मागणी केली जात आहे. इंडियन मेडिकल ऑफ असोसिएशनेदेखील केंद्रीय आरोग्य विभागाकडे आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसरी मात्रा देण्याची मागणी केली होती. अनेक नागरिकांना लशीची एक मात्राही मिळालेली नाही, तेव्हा तिसरी मात्रा देण्याचा विचार सध्या केला जाणार नाही, असे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

रुग्णालयातील काही आरोग्य  कर्मचाऱ्यांनी शरीरातील प्रतिपिंडांची चाचणी केली असून त्यांची क्षमता कमी झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढल्यास आम्हाला बाधा झाली तर काय, असा प्रश्न उपस्थित करत तिसरी मात्रा देण्याची मागणी करत आहेत, असे खार येथील हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

अमेरिकेने प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी तिसरी मात्रा नुकतीच सुरू केली आहे. त्यामुळे तिसरी मात्रा देण्याची नेमकी आवश्यकता आहे का किंवा तिसरी मात्रा दिल्यावर कितपत फायदे आहेत, असा संशोधनात्मक अभ्यास जगभरात कुठेही प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे याबाबत आपल्याकडे ठोस माहिती नाही. याबाबत नुकतीच करोना कृतिदलाच्या बैठकीतही चर्चा झाली असून कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना तिसरी मात्रा देण्याची शिफारस करणे योग्य नाही, असेही या बैठकीत ठरविले गेले. प्रतिपिंडांमुळे नक्कीच संरक्षण वाढते. परंतु याचा नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीवरही परिणाम होण्याचा धोका आहे. तेव्हा तिसरी मात्रा देणे कितपत सुरक्षित आहे याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे.         

– डॉ. राहुल पंडित, कृतिदलाचे सदस्य 

दोन्ही मात्रा पूर्ण झाल्यानंतरही करोनाची बाधा झाल्यास संसर्गाची तीव्रता कमी आहे. तेव्हा राज्यातील, देशातील कोटय़ावधी नागरिक लशीपासून वंचित राहिलेले असताना तिसऱ्या मात्रेची मागणी करणे योग्य नाही. 

– डॉ. शशांक जोशी, कृतिदलाचे सदस्य

तिसऱ्या मात्रेची आवश्यकता आहे, अशी कोणतीही संशोधनात्मक माहिती अद्याप देशात समोर आलेली नाही. मॉर्डना आणि अस्ट्राझेनेका यांच्या अभ्यासामध्ये अधिक प्रतिपिंडे असल्यास अधिक संरक्षण मिळेल असा संबंध लावलेला आहे. परंतु यामध्ये किमान किती प्रतिपिंडे असल्यास संरक्षण मिळेल याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सध्या तिसऱ्या मात्रेची आवश्यकता आहे का हे ठोसपणे सांगता येणार नाही.

– डॉ. गगनदीप कांग, विषाणूरोगशास्त्रतज्ज्ञ.