रवींद्र पाटील अविश्वनीय साक्षीदार- उच्च न्यायालय

अपिलावरील निकाल आज येण्याची शक्यता
अभिनेता सलमान खान याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अपघात केल्याची साक्ष देणारा त्याचा मृत्युमुखी पडलेला माजी अंगरक्षक आणि सलमानविरोधातील खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार रवींद्र पाटील याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सलमानच्या अपिलावरील निकाल वाचनादरम्यान नोंदवले. पाटील याने सुरुवातील सलमानने मद्यपान केल्याचे आणि गाडी चालवल्याचे सांगितले नव्हते. मात्र नंतर त्याने वेळोवेळी आपली साक्ष बदलली. त्यामुळे त्याची साक्ष विश्वसनीय नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत सलमानच्या अपिलावरील अंतिम निकाल गुरुवारी देण्याचे स्पष्ट केले.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सलमानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्य़ासाठी दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याला सलमानने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून गेल्या सोमवारपासून न्यायमूर्ती ए. आर. जोशी त्यावर निकालवाचन करत आहेत. बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने सलमानविरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातील चार मुख्य मुद्दय़ांबाबत आपले निरीक्षण नोंदवले. त्यात खटल्यातील सलमानचा अंगरक्षक मुख्य साक्षीदार रवींद्र पाटील याची साक्ष, रवींद्र पाटील याच्याव्यतिरिक्त या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि सलमानचा मित्र कमाल खान याला साक्षीसाठी न बोलावण्याचा मुद्दा, खटल्याच्या वेळेस सलमानच्या वतीने साक्षीसाठी पुढे आलेला आणि अपघात आपण केल्याचे सांगणारा त्याचा चालक अशोक सिंग याचा मुद्दा आणि सलमानच्या गाडीच्या डाव्या बाजूचा टायर फुटल्याचे सांगणाऱ्या पंचसाक्षीदाराची साक्ष या मुद्दय़ांबाबत न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
रवींद्र पाटील याने सर्वप्रथम तक्रार नोंदवताना सलमान नशेत होता आणि गाडी चालवत होता, असे सांगितलेच नव्हते; परंतु अपघाताच्या वेळेस सलमान नशेत होता व गाडी चालवत होता, अशी साक्ष त्याने महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर दिली. उलटतपासणीच्या वेळेस त्याने पुन्हा साक्ष बदलली. त्याने सतत साक्ष बदलल्याने ती अविश्वसनीय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. शिवाय त्याचा मृत्यू झाल्याने सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात आला त्या वेळी तो उपलब्ध होऊ शकला नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्याच्याव्यतिरिक्त प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या कमाल खानलाही साक्षीसाठी आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.