टाळेबंदी लागू असताना वांद्रे येथील मजुरांच्या जमावप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. परप्रांतीय मजुरांना चिथावणी दिल्याप्रकरणी विनय दुबे तर, रेल्वेसेवा सुरू होण्याबाबत वृत्त दिल्याने ‘एबीपी माझा’चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

वांद्रे रेल्वे स्थानकाजळ मंगळवारी सुमारे तीन हजार परप्रांतीय मजूर एकत्र आले आणि त्यांनी मदत नको, गावी जाऊ द्या, असा हट्ट धरला. मागणी पूर्ण होईपर्यंत येथेच धरणे देण्याचा निर्णय जमावाने घेतला. ही गर्दी उत्स्फु र्तपणे येथे जमली, टाळेबंदीची मुदत आणखी वाढल्याच्या अस्वस्थतेतून या गर्दीने आंदोलन केले की विशिष्ट हेतूने गर्दी गोळा केली गेली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. अद्याप कोणत्याही निष्कर्षांवर पोहोचलेलो नाही, असेही त्यांनी सांगितले.

अफवा पसरविणे, शासनाने जारी कलेल्या आदेशाची अवज्ञा करून मानवी जीवन धोक्यात आणणे,  साथरोग पसरेल अशी घातक कृती या कलमान्वये राहुल यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांना उस्मानाबादहून वांद्रे पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अटक करण्यात आली.