वाढीव वीज देयकांवरून गोंधळ सुरू असताना ग्राहकांनी मागणी के ल्यास वीज देयकाचे समान तीन हप्ते करून देण्यात येतील आणि एकरकमी वीज देयक भरणाऱ्यांना दोन टक्के सवलत देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी जाहीर केले.

टाळेबंदीच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणसह सर्वच वीज वितरण कंपन्यांना वीज मीटर वाचन न करता एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराची देयके आकारण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने केली होती. जूनमध्ये टाळेबंदीत शिथिलता दिल्याने प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने वीज मीटर वाचन करून प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीज देयके देण्यात आली.

टाळेबंदीच्या काळात दिलेली सरासरी वीज देयके ही हिवाळ्यातील वीजवापरावर दिलेली आहेत आणि घरगुती ग्राहक उन्हाळ्यात टाळेबंदीमुळे घरी राहिल्याने त्यांच्या वीजवापरात मागच्या वर्षीपेक्षा वाढ झालेली आहे. त्यामुळे जूनमधील वीज देयकांत ते समाविष्ट झाले, असे राऊत यांनी स्पष्ट केले.