शिवसेनेच्या यंदाच्या दसऱ्या मेळाव्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. शिवसेनेचा कालचा दसरा मेळावा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फ्लॉप चित्रपटा सारखा होता, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, हिंदुत्वाच्या मुद्यावरून देखील शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना संघाकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता असल्याचं शेलार यांनी सांगितलं आहे.

”शिवसेनेचा कालचा दसरा मेळावा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फ्लॉप चित्रपटासारखा होता. उद्धव ठाकरे त्यांच्या हिंदुत्वाची संघाच्या हिंदुत्वाबरोबर तुलना करत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेल्यापासून त्यांचे हिंदुत्व भेसळयुक्त झाले आहे. होय, उद्धव ठाकरेंना संघाकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता आहे.” असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

तसेच, ”संपूर्ण भाषणात जळफळाट व केवळ जळफळाट होता. एका बाजुला अर्णब गोस्वामींनी कंगना रणौतनी जी काही शिवसेनेची वाट लावली त्याचं दडपण व दुसऱ्या बाजुला संरसंघचालकांच्या भाषणामागे स्वत:ला दडवण्याचा प्रयत्न म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण होतं. भाजपच्या ताकदीची दहशतही त्यांच्या भाषणामध्ये दिसत होती. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या हिंदुत्वाची तुलना संघाच्या हिंदुत्वाशी करणं हा त्वचा नी शाल यांच्यामध्ये असलेला फरक आहे. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व म्हणजे म्हणजे गरज नसताना हिंदुत्वाची शाल बाजुला ठेवणं आहे, तर संघाचं हिदुत्व हे त्वचेसारखं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला संघाचं समर्थन आहे, तर उद्धव ठाकरेंचं आधी समर्थन होतं, मग सभागृहातून पळ काढला व बाहेर पडल्यावर अशा भेसळयुक्त हिंदुत्वाची भाषा सरसंघचालकांच्या भाषणात नव्हती. असं शेलार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्व समजून घ्यावं; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

मुंबईतली स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांवर टीकेची तोफ डागली होती.

‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचं हिंदुत्व नाही. आज महिलांवर अत्याचार होत आहेत, हत्या होत आहेत. महाराष्ट्रात तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात मग तो गोव्यात का नाही? मी विधानसभेत म्हटलं होतं की इथे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता.

आणखी वाचा- राज्यपालांना टोला लगावत उद्धव ठाकरेंचं बिहारच्या मतदारांना आवाहन; म्हणाले…

तसेच, “शिवसेनाप्रमुखांचं आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. तुम्हीच बडवा ती घंटा तुम्हाला दुसरं येतंय काय? मला अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व हवंय. नाहीतर करोना आला थाळ्या बडवा, घंटा बडवा हेच तुमचं हिंदुत्व. बेडूक उड्या, कोलांटी उड्या, दोरीच्या उड्या मारणारं हे कसलं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्याच सांगितली होती.

आणखी वाचा- “वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?”

हिंदुत्व कसं हवं जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं, हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. सकाळी रा. स्व. संघाचा मेळावा झाला यामध्ये सरसंघचालकांनी भाषण केलं. त्यांना मानणारे आणि त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर डोक असेल तर त्या डोक्यानं तुमच्या सरसंघचालकांच्या वाक्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडून हिंदुत्व समजून घ्यावं, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता.