डोंगरी, मशीद, उमरखाडी, भेंडीबाजारातील इमारतींवर हातोडा

डोंगरी येथे केसरबाई इमारत पडून दुर्घटना झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पालिकेने आता ‘बी’ विभागातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याच्या मोहिमेला आजपासून सुरुवात केली. शनिवारी पहिल्या दिवशी सॅम्युअल स्ट्रीट आणि मोहम्मद अली मार्गावरील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात आली.

डोंगरी येथील केसरबाई इमारत मंगळवारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला तर १० जण जखमी झाले. बी विभागातील डोंगरी, मशीद, उमरखाडी, भेंडीबाजार या भागात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकाम असताना त्याविरोधात कोणतीही कारवाई सुरू न केल्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ‘बी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त विवेक राही यांना निलंबित केले. सध्या ‘सी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांना या विभागाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.  विसपुते यांनी शनिवारी कारवाई सुरू केली.

स्थायी समितीमध्ये बुधवारी नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामाची छायाचित्रे, कागदपत्रे दाखवली. भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी स्थायी समितीत काही अनधिकृत बांधकामांबाबतचे पुरावे सादर केले होते. त्यांनी ‘बी’ विभागात या बांधकामांच्या विरोधात तक्रारही केल्याचे ते यावेळी म्हणाले. तेव्हा पालिका आयुक्तांनी या बांधकामांवर २४ तासात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. नार्वेकर यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे आजची कारवाई करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ‘बी’ विभागात अनधिकृत बांधकामाच्या ९२८ तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी पालिकेने केवळ ८७ बांधकामांवर कारवाई केली आहे.

मालाड दुर्घटनेतील बळींचा आकडा ३१ वर

मुंबई : मालाडमधील पिंपरीपाडा येथे १ जुलैला रात्री संरक्षक भिंत पडून झालेल्या दुर्घटनेतील एका जखमी महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. बसंती किशोर शर्मा असे पन्नास वर्षीय महिलेचे नाव असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३१ वर गेला आहे.