ज्येष्ठांचा कमी प्रतिसाद; कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेसाठी गर्दी

मुंबई : तीन दिवसांनंतर मंगळवारी सकाळी मुंबईतील काही केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरू झाले; परंतु सकाळी सुरू असलेला पाऊस आणि फक्त ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण खुले असल्याने केंद्रावर तुलनेने कमी गर्दी होती. कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद कमी होता; परंतु कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या मात्र रांगा लागल्या होत्या. प्रत्येक केंद्रावर १०० लशींचा साठा असल्याने यातील अनेकांना माघारी परतावे लागले.

महापालिकेच्या राजावाडी, बीकेसी करोना केंद्र, दहिसर करोना केंद्र, केईएम, नायर, कूपर या मोठय़ा रुग्णालयांमध्ये मंगळवारी लसीकरण बंदच ठेवण्यात आले होते. मुंबईतील लशींचा साठा बुधवारी संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत साठा आला नाही तर काय करावे, असा प्रश्न पालिकेपुढे निर्माण झाला आहे.

लशींचा साठा अपुरा असल्यामुळे आणि चक्रीवादळामुळे स्थगित केलेले लसीकरण मंगळवारी पुन्हा पूर्ववत सुरू झाले. मंगळवारी ६० वर्षांवरील आणि अपंग नागरिकांना पूर्वनोंदणी न करता थेट लस देण्यात येत होती; परंतु मंगळवारी सकाळीही काही भागांत पाऊस रिपरिपत असल्याने केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. ‘आमच्याकडे सकाळी ज्येष्ठ नागरिकांची विशेष गर्दी नव्हती. दुपारनंतर थोडा प्रतिसाद वाढला. सायंकाळपर्यत दिलेल्या १०० मात्रांपैकी केवळ ८४ मात्रा संपल्या होत्या. याउलट कोव्हॅक्सिन घेतलेले नागरिक मोठय़ा संख्येने आले होते. दिलेल्या १०० मात्रा संपल्याने उर्वरित नागरिकांना परत पाठवावे लागले, असे कांदिवली शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतिमा पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या पहिल्या मात्रेचे लसीकरण आमच्याकडे होते. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत फार कमी गर्दी होती. दुपारी ३ पर्यंत ११६ नागरिकांना लस दिल्याची माहिती मालाडच्या स.का. पाटील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद ज्येष्टे यांनी दिली. प्रत्येक केंद्रावर किमान १०० मात्रा देण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांनी लस घेण्यासाठी मंगळवारी गर्दी केल्याने काही केंद्रांवरील या लशींचा साठा संपला. त्यामुळे लाभार्थ्यांना लस न घेताच जावे लागले.

बुधवारी साठा संपणार?

पालिकेला गेल्या आठवडय़ात ८० हजार लशींचा साठा प्राप्त झाला होता. हा साठा ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी पुरावा म्हणून शनिवारी आणि रविवारी लसीकरण बंद ठेवले होते. त्यामुळे आता बुधवारी साठा संपण्याची शक्यता आहे. पुढील साठा येण्याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.