मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ३१ खासगी लसीकरण केंद्र लससाठ्या अभावी बंद ठेवण्यात आली. दिवसभराती लसीकरणाचा वेग मंदावला असून सोमवारी केवळ ३५ हजार ३०९ लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १० हजार लोकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली.

केंद्र सरकारने एकीकडे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईत अद्याप पहिल्या दोन टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले नाही. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे व ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण वेगाने झालेले नाही. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिके ने मुंबईतील केंद्र वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र लससाठ्याअभावी हा वेग अद्याप कमीच आहे. मुंबईत सध्या लसीकरणासाठी १२९ केंद्र आहेत. त्यापैकी पालिके ची ३९, राज्य व केंद्र सरकारची १७ आणि खासगी रुग्णालयातील ७३ केंद्र आहेत. मात्र यापैकी ३१ केंद्र सलग दोन दिवस बंद ठेवावी लागली आहेत.

मुंबईत गेल्या आठवड्यापर्यंत ४० ते ५० हजार लोकांचे लसीकरण एका दिवसात होत होते. मात्र सोमवारी ३५,३०९ लोकांचेच लसीकरण होऊ शकले. खासगी केंद्रांवर जेमतेम ५८५८ लोकांचे लसीकरण होऊ शकले.

मुंबईत आतापर्यंत २० लाखाहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख ६१ हजार नागरिाकांच्या दोन्ही मात्रा घेऊन झाल्या आहेत.