देशात सध्या अशाप्रकारचे वातावरण आणि असहिष्णुता आहे की विनोद करण्याचीही दहशत वाटते असे मत अभिनेता आणि स्टँड कॉमेडियन शेखर सुमन यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्त वाहिनीच्या मुंबई मंथन या कार्यक्रमात शेखर सुमन आणि राजू श्रीवास्तव यांना बोलावण्यात आले. या कार्यक्रमात शेखर सुमन यांनी त्यांची रोखठोक मतं मांडली. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळी एकदा ते मला भेटले. त्यांनी माझ्या कार्यक्रमाचे कौतुक केले तसेच तू ज्या प्रकारे विनोद करतोस ती शैली मला आवडते असेही ते मला म्हटले. त्यांचा काळच वेगळा होता, हल्ली तर विनोद करण्याचीही दहशत वाटते असे वातावरण देशात आहे असे शेखर सुमन यांनी म्हटले आहे.

कॉमेडी शोचे स्वरूपच बदललं आहे, काही वेळा तर बळजबरीने हसावं लागतं. ओढूनताणून विनोद केले जातात, इंग्रजी कॉमेडियन द्वयअर्थी विनोद करतात त्यांना वाटतं की त्यांचा प्रेक्षक सगळं काही सहन करू शकतो असे मत राजू श्रीवास्तवने मांडले. आधीचा समाज जास्त सुशिक्षित होता, शरद जोशी, हरिशकर परसाई आणि राहीजी म्हणायचे ते लोकांनी मान्य केले. सध्या लोकांनी विचार करणं सोडून दिलं आहे. मार्मिक विनोद संपत चालला आहे आणि विनोदाला फास्ट फूडचं स्वरूप आलं आहे. विनोद आता कुठेतरी हरवून गेला आहे असंही शेखर सुमन यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये कॉमेडीचा विकासही झाला आणि नाशही झाला. सगळ्यांच्या स्मार्ट फोनमध्ये जोक्स येतात त्यावर लोक हसतात आणि विषय संपतो. हाय क्लास सोसायटीचे लोक खुलेपणाने हसतही नाहीत. काही दिवसांपूर्वी मी सेनेसाठी कार्यक्रम केला तिथे मुख्य अधिकारी हसले की मग जवान हसत होते असा अनुभव मी घेतला असेही राजू श्रीवस्तवने म्हटलं आहे.