निम्म्याहून अधिक घरे रिकामी राहिल्याने कोकण मंडळाला फटका

मंगल हनवते

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी १८ जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीतील घरांच्या विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत अंदाजे २ हजार २३ कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाच्या १० मे रोजी काढण्यात आलेल्या ४ हजार ६५४ घरांच्या सोडतीतून म्हाडाला केवळ १९४ कोटी रुपये मिळणार आहेत. ४ हजार ६५४ घरांच्या विक्रीतून कोकण मंडळाला अंदाजे ७५० कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना कोकण मंडळातील निम्मीही घरे विकली न गेल्याने हा फटका मंडळाला पर्यायाने म्हाडाला बसला.

मुंबई मंडळाची तब्बल ४ हजार ८२ घरांची सोडत १८ जुलैला होणार आहे. या सोडतीत महागडी घरे मोठय़ा संख्येने असल्याने म्हाडाच्या तिजोरीत अंदाजे २ हजार २३ कोटी रुपयांची भर पडणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.मंडळाच्या ४ हजार ८२ घरांमध्ये पहाडी येथील १ हजार ९४७ घरांचा समावेश असून घरांची किंमत ३० लाख ४४ हजार रुपये आहे. पहाडीतील ४५ लाख ८६ हजार रुपये किमतीच्या ७३६ घरांचाही समावेश सोडतीत आहे. ४० लाख रुपये किमतीची ४१७ घरे, ३४ लाख ७४ हजार रुपये किमतीची १६६ घरे, ३६ लाख १६ हजार किमतीची २५८ घरे सोडतीत आहेत. महागडी अशी अगदी ५० लाखांपासून ते थेट साडेसात कोटी रुपयांची घरेही सोडतीत समाविष्ट आहेत. त्यामुळे या विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत २ हजार २३ कोटी रुपये जमा होणार आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या म्हाडासाठी ही दिलासा देणारी बाब ठरणार असल्याचे म्हटले जाते.

दुसरीकडे कोकण मंडळाच्या १० मे रोजी काढण्यात आलेल्या सोडतीतून ७५० कोटींऐवजी केवळ १९४ कोटी मिळणार आहेत. कोकण मंडळाची केवळ २ हजार १३१ घरे विकली गेली आहेत. विरार-बोळींजमधील २३ लाख २८ हजार ते ४१ लाख ८१ हजार रुपये किमतींची तब्बल २ हजार ४८ घरे असताना आणि यातूनच मोठी रक्कम मंडळाला मिळणार असताना हीच घरे विकली गेली नाहीत. २ हजार ४८ पैकी केवळ २६२ घरे या सोडतीत विकली गेली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान आवास योजनेत १५ ते २१ लाख रुपये किमतीची ९८४ घरे असताना यातीलही अंदाजे ३५० घरे विकली गेली आहेत. तर, दुसरीकडे या सोडतीतील २० टक्के योजनेतील सर्वच्या सर्व १ हजार ४५६ घरे विकली गेली असली तरी यातून मंडळाला केवळ अंदाजे तीन कोटी रुपयेच मिळणार आहेत. कारण या घरांच्या विक्री किमतीतील केवळ एक टक्का रक्कम मंडळाला मिळते. एकूणच या सर्व बाबी लक्षात घेता कोकण मंडळाच्या सोडतीतून ७५० कोटींपैकी १९४ कोटीच मिळण्याची शक्यता आहे. त्यात विजेत्यांनी घरे परत केल्यास यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.