मुंबई : मुलांच्या आरोग्याचे संवर्धन आणि विकास साधण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास २ कोटी मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून, ३,३३४ मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याशिवाय ३२,८०१ अन्य आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणारे जन्मत: असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे तसेच बालकांची आरोग्याची तपासणी व त्यांच्यात आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाचा लाभ राज्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास २ कोटी मुलांना होत आहे. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावर ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून दोन वेळेस आरोग्य तपासणी करण्यात येते. या व्यतिरिक्त शासकीय व निमशासकीय शाळेतील ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांनाही या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा लाभ होत आहे. या आरोग्य तपासणी दरम्यान मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य विषयक समस्या, अडचणीसाठी योग्य त्या संदर्भ सेवा व सर्व प्रकारचे वैद्यकीय व शल्य चिकित्सक उपचार मोफत पुरविण्यात येतात.

आणखी वाचा-शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची सायबर फसवणूक

या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत दोन वेळा ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली असून, पहिल्या फेरीत ६३,४५,०४७ तर दुसऱ्या फेरीत ६७,४०,०७१ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. शाळा स्तरावर याच कालावधीत १,२२,०६,६२७ मुलांची तपासणी करण्यात आली असून, ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया, तर ३२,८०१ मुलांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम १ एप्रिल २०१३ पासून लागू करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची पथके प्रत्येक तालुक्यात नियुक्त करण्यात आलेली असून, या पथकाचे मुख्यालय, ग्रामीण रुग्णालये किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय असते. प्रत्येक पथकात एक वाहन, दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषधी निर्माण अधिकारी, एक एएनएम, तपासणी साहित्य, इत्यादी पुरविण्यात आलेले आहे. आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे गावनिहाय वेळापत्रक शिक्षण आणि महिला व बाल कल्याण विभागांच्या समन्वयाने तयार करुन प्रत्येक पथकास ठराविक वेळापत्रकाप्रमाणे तपासणी करावी लागते असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.