मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआयI) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’अंतर्गत विशेष मोहीम राबवून पाकिस्तानातून बेकायदेशीरित्या आयातीबाबत कारवाई करण्यात आली. या न्हावा शेवा परिसरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत ३९ कंटेनर जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये सुमारे १११५ मेट्रिक टन वस्तू सापडल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची किंमत सुमारे ९ कोटी रुपये आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणात एका आयातदार कंपनीच्या भागीदाराला शुक्रवारी डीआरआयने अटक केली.
पाहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानमधून थेट अथवा अप्रत्यक्ष आयात किंवा वितरण होणाऱ्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू केली आहे. यापूर्वी तेथून आयात होणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के सीमाशुल्क आकारण्यात येत होते. तरीही काही आयातदार पाकिस्तानातून इतर देशांमध्ये वस्तू पाठवून त्या भारतात आयात करीत होते. त्यासाठी कागदोपत्री खोटी माहिती दिली जात होती. नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर झालेल्या दोन स्वतंत्र कारवाईत हे कंटेनर पकडण्यात आले. त्या वस्तू अमेरिकेतून पाठवण्यात आल्याचे भासवण्यात आले होते. मात्र त्या वस्तू प्रत्यक्षात पाकिस्तानातून आल्या होत्या. दुबईमार्गे त्या वस्तू भारतात पाठवण्यात आल्या होत्या.
तपासादरम्यान, या वस्तू प्रथम पाकिस्तानातील कराची बंदरातून दुबईला कंटेनरमार्फत पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसरा कंटेनर व जहाजांमार्फत त्या भारतात पाठवण्यात आल्या. कागदपत्रांची व वस्तूंची पडताळणी केली असता त्या वस्तू प्रथम कराची ते दुबई आणि तेथून भारतात जाणाऱ्या मालवाहतुकीचा संपूर्ण पुरावा मिळाला. या व्यवहारांदरम्यान पाकिस्तानातील संस्थांशी आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे. ती रक्कम कशी हस्तांतरित करण्यात आली याबाबत डीआरआय तपास करीत आहे. हा प्रकार पाकिस्तान व युएईमधील काही व्यक्तींमार्फत सुरू होता. सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानातील वस्तू इतर देशांमधून भारतात आणल्या जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.