लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः खेळण्याच्या बहाण्याने १० वर्षांच्या मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने १५ दिवसांपूर्वी पीडित मुलीवर अत्याचार केला. पण मुलीने नुकताच हा प्रकार तिच्या आत्याला सांगितला. त्यानंतर आत्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे घाटकोपर पोलिसांनी मंगळवारी भादंवि कलमांतर्गत बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली.
हेही वाचा… भाजप पदाधिकाऱ्यांची उद्या भिवंडीत बैठक; फडणवीस, बावनकुळेंसह केंद्रीय नेत्यांची उपस्थिती
तक्रारीनुसार, २६ जून रोजी पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी आरोपीने खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधली व त्यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे केले. राजावाडी रुग्णालयात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करीत आहेत.