मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वे नियमित रेल्वे गाड्यांबरोबरच विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे. तर, मुंबईत राहणारे मुळचे बिहारमधील नागरिक आणि अन्य प्रवाशांसाठी कटिहार – मुंबई सेंट्रलदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येत आहे. परंतु, ही रेल्वेगाडी २९ एप्रिलपर्यंत धावणार होती. प्रवाशांच्या सोयीसाठी आता ही रेल्वेगाडी ३ जूनपर्यंत चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विविध ठिकाणी विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे. मुंबई सेंट्रल – कटिहार, उधना – समस्तीपूरदरम्यान विशेष रेल्वेगाडी धावत असून, या रेल्वेगाड्यांचा कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढविण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०९१८९ मुंबई सेंट्रल – कटिहार साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २६ एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार होती. परंतु, आता या रेल्वेगाडीच्या कालावधीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९१९० कटिहार – मुंबई सेंट्रल २९ एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार होती. आता ही रेल्वेगाडी ३ जूनपर्यंत चालविण्यात येणार आहे. या रेल्वेगाडीला बोरिवली, वापी, उधना, भरूच, वडोदरा, रतलाम, उज्जैन, संत हिरदाराम नगर, विदिशा, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, फतेहपूर, प्रयागराज, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, बेगूसराय, खगरिया आणि नवगछिया स्थानकांवर थांबा असेल. या रेल्वेगाडीला द्वितीय वातानुकूलित श्रेणी डबे, तृतीय वातानुकूलित श्रेणी डबे, शयनयान आणि जनरल द्वितीय श्रेणी डबे असतील.

गाडी क्रमांक ०९०६७ / ०९०६८ उधना – जयनगर साप्ताहिक अनारक्षित विशेष रेल्वेगाडीच्या आठ फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०९०६७ उधना – जयनगर विशेष रेल्वे उधना येथून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.५० वाजता जयनगरला पोहोचेल. ही रेल्वेगाडी ४ मे ते २५ मे २०२५ या कालावधीत धावेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०६८ जयनगर – उधना विशेष रेल्वेगाडी दर सोमवारी जयनगरवरून रात्री ११.५० वाजता सुटेल आणि दर बुधवारी दुपारी १२.१५ वाजता उधना येथे पोहोचेल. ही रेल्वेगाडी ५ मे ते २६ मे दरम्यान धावेल. या रेल्वेगाडीला चलठाण, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपूत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी येथे थांबेल. या रेल्वेगाडीला सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.