मुंबई: मुंबई – पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गुरूवार, ११ जानेवारी रोजी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी ९.८०० (पनवेल एक्झिट) आणि कि.मी २९.४०० ( खालापूर टोल प्लाझा आणि मडप बोगद्यादरम्यान) येथे गुरूवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) गॅन्ट्री बसविण्याचे काम करणार आहे. गुरुवारी दुपारी १.३० ते ३.३० दरम्यान हे काम करण्यात येणार आहे. या कामादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील सर्व हलक्या आणि जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा… राज्यातील महामार्गांवर १८७ स्पीडगन इंटरसेप्टर वाहने तैनात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वाहतूक ब्लॉकदरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने आणि बसेस खोपोली एक्झिट कि.मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्ग वरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील. तर पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड – अवजड वाहने खालापूर टोल नाका येथील डाव्या बाजूकडील शेवटची लेन खालापूर एक्झिट येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खालापूर शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.