मुंबई : भायखळा आणि बोरिवलीमध्ये बांधकाम बंदी लागू केल्यानंतर या भागातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. दरम्यान, समीर ॲपवरील नोंदीनुसार बुधवारी मात्र भायखळा आणि देवनार येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली.

मुंबईतील हवा गुणवत्ता खालावल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेने डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कठोर उपाययोजना सुरू केल्या होत्या. भायखळा, तसेच बोरिवली या परिसरातील हवा निर्देशांक सातत्याने २०० च्या वर होता. अनेकदा या भागात ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली होती. त्यामुळे या भागातील बांधकामांवर बंदी घालण्यात आली होती. बंदी लागू केल्यानंतर काही दिवसांतच या परिसरातील हवा गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान, तब्बल १५ दिवसांनी भायखळा येथे मंगळवारी ‘वाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक दुपारी ४ च्या सुमारास २०८ इतका होता. याचबरोबर देवनार येथेही ‘वाईट’ हवा नोंदली गेली. येथील हवा निर्देशांक २७८ इतका होता. बोरिवली येथील हवा गुणवत्ता मात्र स्थिर आहे. बांधकाम बंदी लागू केल्यानंतर येथील हवेची ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंद होत आहे. तेथील हवा निर्देशांक बुधवारी ९७ इतका होता. याआधी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून बोरिवली येथे ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली होती.

हेही वाचा >>>‘कोल्ड प्ले’साठी मुंबई-अहमदाबाद विशेष रेल्वेगाड्या

दरम्यान, या दोन्ही परिसरातील ७८ बांधकामांवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी घातल्यानंतर चारच दिवसांत या भागातील हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाली होती. त्यानंतर भायखळ्यातील हवेचा निर्देशांक १२० ते १४० च्या दरम्यान होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोवंडीतील शिवाजीनगरच्या हवेत सुधारणा

गोवंडीतील शिवाजीनगर येथील हवेचा स्तर सातत्याने खालावत असल्याने काही दिवसांपूर्वी या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मॉनिटरिंग व्हॅन ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात कोणत्या वेळी हवा अधिक प्रदूषित असते, कोणत्या धूलीकणांचे प्रमाण अधिक असते हे समजण्यास मदत होईल, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार, शिवाजी नगरमधील हवेत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. येथील हवा बुधवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. तेथील हवा निर्देशांक १३७ इतका होता.