मुंबई : शून्य अपघात आणि गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा व्हावी यासाठी मध्य रेल्वेवरील समांतर रस्ता फाटक (लेव्हल क्राॅसिंग गेट) बंद करून त्याजागी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. मात्र मध्य रेल्वेवरील फाटकांजवळील उड्डाणपुलाचे काम कूर्मगतीने सुरू असून मध्य रेल्वेवरील वक्तशीरपणाचे तीनतेरा वाजत आहेत. तसेच पादचारी फाटकातूनच ये-जा करीत असून त्यामुळे अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू होत आहे. ही बाब लक्षात घेऊन यापुढे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी फाटकांजवळ आरपीएफ, तिकीट तपासनीस तैनात करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १७१ समांतर रस्ता फाटक असून तेथून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. सीएसएमटी – कल्याणदरम्यान एकमेव दिवा येथे फाटक आहे. तसेच सीएसएमटी – पनवेलदरम्यान शिवडी, कुर्ला आणि चुनाभट्टी येथे, त्याचबरोबर कल्याण – कसाऱ्यादरम्यान १८, कल्याण – लोणावळ्यादरम्यान २१, तर दिवा – रोह्यादरम्यान ६५ फाटक आहेत. यापैकी दिवा येथील फाटकावर वाहनांची प्रचंड रहदारी असते. येथील उड्डाणपुलाचे काम अर्धवट झाले असून या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी फाटक अधिक काळ खुले ठेवावे लागते. दरवाजा उघण्यास आणि बंद करण्यास अधिक वेळ लागत असल्याने लोकलला लाल सिग्नल दाखविला जातो. हिरवा सिग्नल मिळताच लोकलची ये-जा सुरू होते. त्याच वेळी रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात आसलेल्या प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. परिणामी, लोकलचा खोळंबा होतो आणि वक्तशीरपणावर परिणाम होतो. प्रवाशांचा मृत्यू होऊ नये आणि लोकल नियोजित वेळेत धावावी, यासाठी रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – मुंबई : कमी जागेत सरकत्या जिन्यांची उभारणी, प्रवाशांना फलाटावरून प्रवास करणे होणार सोयीस्कर

मध्य रेल्वेने दिवा येथील समांतर रस्ता फाटकाजवळ उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या उड्डाणपुलाचे गर्डर उभारण्यात आले आहेत. पुढील काम स्थानिक महापालिका करीत आहे. इतर फाटकाच्या तुलनेत दिव्यातील फाटकातून वाहन आणि पादचाऱ्यांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे येथे अपघातांची संख्या अधिक आहे. अपघाताच्या घटना रोखण्यासाठी फाटकाजवळ लवकरच आरपीएफ आणि तिकीट तपासनीसांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. नियमानुसार दंडाची वसुली केली जाणार आहे.- रजनीश गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे

हेही वाचा – विकासकांना रेरा कायद्याचा धाक नाही? कारवाईनंतरही रेरा क्रमांकांशिवाय जाहिरात प्रसिद्ध करण्याचे प्रकार सुरूच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवा रेल्वे स्थानकात महिन्याभरात सुमारे १५ प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. बहुतांश प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिवा स्थानक प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. आपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे काम वेगात पूर्ण होणे गरजेचे आहे.