मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी ही निरंतर प्रक्रिया आहे. महिती तंत्रज्ञान विभागाकडून आलेल्या माहितीची पडताळणी केली जात आहे. तोपर्यंत लाभार्थी अपात्र ठरत नाहीत. या योजनेचा चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची माहिती प्रत्येक विभागाकडून मागविण्यात आली आहे. कृषी विभागाने आठ लाख नमो सन्मान शेतकरी योजनेतील लाभार्थींची माहिती दिली होती. त्यातील पाच लाख लाडक्या बहीणी दुहेरी लाभ घेत होत्या. त्यांचे एक हजार रुपये कमी करण्यात आले. सेवार्थ असलेल्या दोन लाख कर्मचाऱ्यापैकी अडीच हजार अपात्र लाडक्या बहीणी ठरल्या आहेत. महिती तंत्रज्ञान विभागाकडून २६ लाख लाभार्थींची माहिती आली आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. त्यातील अपात्र बहीणी ठरविल्या जातील.
सर्वच बहीणी अपात्र आहेत असा निर्ष्कष काढता येणार नाही. यानंतर आयकर विभागाच्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. महिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीत बहीणीचे बँक खाते नसल्याने पतीच्या खात्यात लाभ गेला आहे का याची तपासणी केली जाईल. अपात्र बहीणींच्या लाभाची वसुली केली जाईल असे तटकरे यांनी सांगितले.