Aditya Thackeray : १६ जानेवारीला अभिनेता सैफ अली खानवरर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया पार पडल्या. दरम्यान या प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. तसंच पालकमंत्रिपदावरुन हावरटपणा चालल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

सरकार बहुमताचं आहे, मात्र यांच्यात वाद सुरु आहेत. सुरुवातीला सरकार स्थापन होण्यासाठी वेळ गेला. त्यानंतर खातेवाटप करण्यासाठी वेळ गेला. आता पालकमंत्रिपदांचं वाटप झाल्यावर पुन्हा धुसफूस समोर आली आहे. मुख्यमंत्री परदेशात असताना नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली जाते. हे नक्की काय चाललं आहे? यामागे काही षडयंत्र चाललं आहे का? या दोन जिल्ह्यांचे जे पालकमंत्री नेमले गेले आहेत त्यांचा अपमान झाला आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

कुणासमोरच न झुकणारे मुख्यमंत्री दादागिरी का सहन करत आहेत?

एखाद्या माणसाला पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून कुठल्यातरी चेल्याने नाराज व्हायचं. रास्ता रोको करायचा, टायर जाळायचे त्यानंतर मग पालकमंत्री या पदासाठी हावरटपणा होतो आहे. आधी मंत्रिपदांसाठी असाच हावरटपणा बघायला मिळाला. जॅकेट शिवून ठेवलं असेल पण प्रत्येक वेळी जॅकेट घालायचंच असं नाही. आत्तापासून हे स्वार्थी लोक एकमेकांशी भांडत आहेत. ही भांडणं जनतेच्या सेवेसाठी नाहीत. तर ही भांडणं खातेवाटप, बंगले, पालकमंत्रिपदांसाठी होत आहेत. जनतेने काय समजायचं? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. तसंच हा हावरटपणा चांगला नाही. तसंच आम्हाला वाटत होतं की जे मुख्यमंत्री कुणासमोर झुकत नाही असे मुख्यमंत्री दादागिरी सहन का करत आहेत? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

सैफ अली खानच्या हल्लेखोराबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे?

सैफ अली खानवर १६ जानेवारी हल्ला झाला. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी चातुर्य दाखवून पकडलं. त्या हल्लेखोरासंदर्भात अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. त्याला कसं पकडलं? ते कळलं. तो बांगलादेशी होता ते पण समजलं. पोलिसांचे हात गृहखात्याने बांधले नाहीत तर कुठलाही गुन्हेगार असला तरीही त्याला पोलीस पकडू शकतात. आरोपी ठाण्यात लपला होता. मात्र गृहखात्याची इच्छा नसेल पण वाल्मिक कराडसारख्या लोकांना शरण यावं लागलं. कारण गृहखात्याच्या मनात नव्हतं असं दिसतंय.

पोलिसांना मोकळा हात दिला तर ते काय करु शकतात हे त्यांनी दाखवून दिलं

पोलिसांनी जर मोकळा हात दिला तर ते काय करु शकतात ते त्यांनी दाखवून दिलं असं आदित्य ठाकरे म्हणाले. बांगलादेशी माणूस आपल्या राज्यात लपत असेल, कुणावर तरी हल्ला करत असेल तर काय म्हणायचं? बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी? भाजपाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी बांगलादेशी हटाव अशी घोषमा देत मोर्चे काढले होते. गेली १० ते ११ वर्षे भारतावर भाजपाची सत्ता आहे, आता एनडीएची आहे. तशीच स्थिती महाराष्ट्राची आहे. आमची अ़डीच वर्षे सोडली तर उरलेला काळ त्यांचीच सत्ता आहे. केंद्रात गृहमंत्री भाजपाचे आहेत, राज्यात गृहमंत्री भाजपाचे आहेत. मग मोर्चा काढून सगळ्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं पाहिजे की तुमचं सरकार अकार्यक्षम आहे का? असं आदित्य ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर घटनाबाह्य माजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात राहिला होता-आदित्य ठाकरे

बांगलादेशी नागरिक भारतात आला, कोलकात्यातून मुंबईत आला पण राहिला कुठे? ज्या जिल्ह्यात माजी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते त्यांच्या जिल्ह्यात हा बांगलादेशी राहिला होता. देशात बांगलादेशी घुसत आहेत आणि बांगलादेशात हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या. त्यावर भाजपा किंवा केंद्र सरकार काहीही बोलत नाही. मात्र सैफवर झालेला हल्ला आणि बांगलादेशी माणसाने तो करणं ही बाब धोकादायक आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.