मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत कल्याणमधील मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लायड सायन्स येथील एम.टेक रासायनिक अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरिंग), संगणक अभियांत्रिकी (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग), कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स अँड प्रोसेस ऑटोमेशनसह एम.एस्सी. मटेरिअल सायन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

एम.टेक.च्या विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना https://forms.gle/FNUDnep1Fm9yvq1A6 या लिंकवर जाऊन २ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे. स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लायड सायन्स येथे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ९ सप्टेंबर रोजी घेतली जाणार असून १० सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चितीसाठी नोंदणी केली जाणार आहे. या एम.टेक.

अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय २० एवढी असून अधिक तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच याच केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या एम.एस्सी. मटेरिअल सायन्स या अभ्यासक्रमाचे थेट प्रवेश https://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले असून पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना २ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ३० एवढी आहे. प्रवेशासंबंधित अधिक माहितीसाठी ar.seask@mu.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.