scorecardresearch

खातेवाटपाची प्रतीक्षाच

मंत्रिमंडळात समावेश होऊनही खातेवाटप झालेले नसल्याने नवीन मंत्र्यांना मंत्रालयात दालन उपलब्ध होऊ शकलेले नाही

खातेवाटपाची प्रतीक्षाच
करोनाचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम , ‘कॅग’ चे निरीक्षण

मुंबई : बहुचर्चित मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी खातेवाटप अद्याप जाहीर झाले नव्हते. परिणामी नव्या मंत्र्यांनाही खातेवाटपाची प्रतीक्षा आहे. किती दिवस बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावे लागणार याची कुजबूज मंत्र्यांमध्ये सुरू झाली.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सात दिल्लीवाऱ्या आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. खातेवाटप लगेचच जाहीर केले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण विस्तार होऊन दिवस उलटला तरी खातेवाटप झालेले नव्हते. अजून एक ते दोन दिवसांनी खातेवाटप केले जाईल, असे सांगण्यात येते. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णयांची माहिती दिल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले. यावरून लगेचच खातेवाटप होणार नाही, असा अर्थ काढला जात आहे.

देवेंद्र फडणवीस हे ४० दिवसांपेक्षा अधिक काळ बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. यामुळे मंत्र्यांना काही काळ तरी बिनखात्याचे मंत्री म्हणून कळ काढावी लागेल, अशी कुजबूज मंत्रालयात होती.

मंत्रिमंडळात समावेश होऊनही खातेवाटप झालेले नसल्याने नवीन मंत्र्यांना मंत्रालयात दालन उपलब्ध होऊ शकलेले नाही. नवीन मंत्र्यांना भेटण्यासाठी गर्दी होत असली तरी मंत्रालयात दालनच उपलब्ध नाही, अशी या मंत्र्यांची कोंडी झाली. मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री कायार्लयात तर भाजपच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात हजेरी लावली.  स्वातंत्र्यदिनी प्रथेनुसार जिल्हा मुख्यालयात पालक मंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन होते.  यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असून प्रत्येक घरी तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. स्वातंत्र्यदिन सोमवारी असून तोपर्यंत पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होणे कठीण असल्याने यंदा सर्व मंत्र्यांना झेंडावंदनासाठी जिल्हे ठरवून देण्यात येणार आहेत. त्याबाबतचे आदेश दोन-तीन दिवसांत काढले जाणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.